चिंचवडमध्ये पैश्यांच्या वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

चिंचवडमध्ये पैश्यांच्या वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

चिंचवड | १० नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड परिसरात २० हजार रुपयांच्या आर्थिक वादातून एका ३२ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या चारचाकी वाहनाच्या दरवाजाचेही नुकसान करण्यात आले आहे. ही घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वाल्हेकरवाडी रोडवरील आहेर गार्डन जवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर मधू लोंढे (वय ३२ वर्षे, चिंचवड, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात अनिलसिंग बच्चनसिंग टाक (राहणार ओटास्कीम, निगडी, पुणे) आणि लखन जुने यांचा मुलगा (वय अंदाजे १८ वर्षे, राहणार ओटास्कीम, निगडी, पुणे) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मयूर लोंढे आणि संबंधित आरोपी यांच्यात २० हजार रुपयांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. या वादातून आरोपींनी फिर्यादीला चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी रोडवरील आहेर गार्डन जवळ बोलावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी त्या ठिकाणी आल्यानंतर आरोपींनी त्यांना कोयत्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले, असे तक्रारीत म्हटले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

एवढ्यावरच न थांबता आरोपींपैकी लखन जुने याच्या मुलाने कोयत्याने फिर्यादीच्या चारचाकी वाहन क्रमांक एमएच १४ एमएम ३१७७ च्या दरवाजावर वार करून नुकसान केले, असेही फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेनंतर मयूर लोंढे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८६/२०२६ नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(२), ३५२, ३२४(४), ३(५) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ४(२५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories