पिंपळे गुरवमध्ये गोदामांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान, अग्निशामक दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात
पिंपरी, ता. १७ - पिंपळे गुरव येथील भाऊनगर परिसरातील चार गोदांमाना सोमवारी (ता. १६) दुपारी लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाने तत्परतने आग विझवली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
पिंपळे गुरवमधील भाऊनगर परिसरात विश्वकर्मा मंदिराजवळ ही गोदामे आहेत. त्यामध्ये प्लायवुड फर्निचर, स्क्रॅप सामान ठेवले होते. दुपारी अचानक तिथे आग लागली. नागरीकांनी आगीची माहिती अग्निशामक दलाला दिली. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलाच्या पिंपरी, राहटणी, भोसरी आणि चोविसावाडी येथील केंद्रांमधून चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले,
भाऊनगर परिसरातील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना आगीच्या ठिकाणी पोचण्यात अडथळे होत होते. महावितरणने तत्काळ वीजपुरवठा बंद केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी आग विझवली. विजय घुगे, गौतम इंगवले, शहाजी कोपनर व विशाल फडतरे हे अग्निशामक दलाचे जवान या पथकात होते. आमदार शंकर जगताप, नगरसेवक शशिकांत कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आमदार शंकर जगताप म्हणाले, ''व्यावसायिकांनी व्यवसायाच्या ठिकाणी अग्निप्रतिबंधात्मक उपकरणे बसवून नियमित फायर ऑडिट करणे आवश्यक आहे. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग लवकर आटोक्यात आली.''
--------------------------------------------------------------------------------------------