'हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा' पुस्तकाचे पिंपळे सौदागमध्ये प्रकाशन
Feb 28 2026
32
'हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा' पुस्तकाचे पिंपळे सौदागमध्ये प्रकाशन
पिंपरी, ता. २८ - '' 'हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा’ हा ग्रंथ केवळ इतिहासाचे दस्तऐवजीकरण नसून समाजजागृतीचा प्रेरणादायी प्रवास आहे. शंभर वर्षांच्या संघर्षातून उभा राहिलेला विचारप्रवाह आणि संघटनशक्ती यांची सविस्तर मांडणी या पुस्तकातून झाली आहे.'' असे मत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशित 'हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा' या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा शुक्रवारी (ता. २७) पिंपळे सौदागर येथे झाला. या समारंभाला काटे प्रमुख पाहणे होते. सांस्कृतिक वार्तापत्राचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत विक्री अधिकारी निखिल देविदास वझे, अनिता काटे, नगरसेविका कुंदा भिसे, जयनाथ काटे, संदेश काटे-पाटील, राजाभाऊ मासूळकर, अभिजित बोरसे, अमित नेमाणे, संदीप काटे, संजय भिसे, दिनेश काटे-पाटील उपस्थित होते.
काटे म्हणाले, ''आजच्या तरुण पिढीने आपल्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा ग्रंथांमुळे राष्ट्रीय अस्मिता अधिक दृढ होते आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते. हा ग्रंथ समाजासाठी मार्गदर्शक ठरेल, असा मला विश्वास आहे.''
या ग्रंथामध्ये गेल्या शंभर वर्षांतील हिंदू समाजजागरणाची वाटचाल, विविध सामाजिक व राष्ट्रीय चळवळी, संघटनात्मक कार्य, विचारप्रवाह आणि संघर्षमय प्रवासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. समाजपरिवर्तन, सांस्कृतिक जतन, राष्ट्रीय अस्मिता आणि संघटनशक्ती यांचे ऐतिहासिक संदर्भांसह विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. विविध टप्प्यांवर आलेल्या आव्हानांचा उल्लेख करत त्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या चळवळींचे दस्तऐवजीकरणही करण्यात आले आहे.
नरेंद्रजी पेंडसे यांनी शहरवासियांना मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मराठी साहित्यातील नवरसांची ओळख करुन दिली. मराठी भाषा ही समृद्ध साहित्यपरंपरा लाभलेली असून तिच्या माध्यमातून समाजमन घडते, असे त्यांनी सांगितले.