हिंजवडी | 12 सप्टेंबर 2026 : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हिंजवडीतील एका तरुणाची 6 लाख 57 हजार 500 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची तक्रार आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी अनिलाश उत्तम मोहिते (वय 28, रा. श्री चेतन पीजी, मुकाईनगर, हिंजवडी) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याच्या उद्देशाने ऑनलाइन गटांमध्ये माहिती शोधत होते. त्यावेळी ‘व्हीआयपी 59 वैभव इलाइट क्लब’ नावाच्या गटातील अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर बाजार आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा करून देण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.
या व्यक्तींनी विविध मोबाइल क्रमांकांवरून संपर्क साधून फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आणि यूपीआय आयडीवर रक्कम पाठवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने टप्प्याटप्प्याने एकूण 6 लाख 57 हजार 500 रुपये पाठविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर संबंधितांनी खाते फ्रीज होईल, चौकशी सुरू होईल आणि गुन्हा दाखल केला जाईल, अशा स्वरूपाचे संदेश पाठवून दबाव आणल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 672/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 318(4), 316(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(डी) अन्वये गुन्हा दाखल असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.