हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइन - ३ चे उद्घाटन मे मध्ये होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, पुण्यात मट्रो भवनचे उद्घाटन
पुणे, ता. १६ - हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाइन - ३ चे उद्घाटन मे मध्ये होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग २३ किलोमीटरचा असून, यापैकी ११ किलोमीटरचा मार्ग मे मध्ये वाहतुकीसाठी खुला होत असून, उर्वरित १२ किलोमीटरचा मार्ग हा जुलैमध्ये खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली.
पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय स्थानक येथे बांधण्यात आलेल्या 'मेट्रो भवन'चे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजूषा नागपुरे, आमदार हेमंत रासने, सुरेश पठारे, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''पुणे मेट्रोचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे. देशातील गतिमान मेट्रो प्रकल्पाच्या यादीत पुणे मेट्रोचादेखील समावेश आहे. पुण्यात सध्या ३३ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो धावत आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आगामी काळात पुणे मेट्रोचा विस्तार हा २०० किलोमीटरवर केला जाणार आहे. यापैकी ८० किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित आहे. पुण्यातील वाहतुकीला गती देण्यासाठी सुमारे ३० ते ३५ हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहे. यात रस्ते, उड्डाणपूल व बोगद्याचा समावेश आहे. पुणे हे वाहतूक कोंडीमुक्त शहर बनविण्यासाठी प्रयत्न आहे. ''
सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर - मेट्रो लाईन -३ प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. विविध तांत्रिक चाचण्या सुरु आहेत. दोन टप्यात या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. पहिला टप्पा हा हिंजवडी ते बालेवाडी साधारण ११ किलोमीटरचा असून हा मार्ग मे महिन्यात प्रवाशांसाठी खुला केला जाईल. यामुळे आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. उर्वरित दुसरा टप्पा हा बालेवाडी ते शिवाजीनगर दरम्यानचा १२ किलोमीटरचा असून तो जुलैमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी तत्त्वावर राबवला आहे. टाटा ग्रुप व सिमेन्स यांनी मिळून 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड' ही कंपनी स्थापन केली आहे. पुणे विद्यापीठ चौकामध्ये मेट्रोसाठी खास 'डबल डेकर' पूल बांधला आहे. या मेट्रोचा ताशी वेग ८० किमीपर्यंत असू शकतो. ज्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हे अंतर केवळ ३५ ते ४० मिनिटांत पार करता येणार आहे.