मार्केटयार्डात आंब्यांची आवक अत्यल्प, गुढीपाडव्याला आंब्यांचे दर तेजीत राहणार
पुणे, ता. १६ - पुणे मार्केट यार्डात मागील वर्षी १० ते १५ मार्च या कालावधीत दररोज दोन ते तीन हजार हापूस पेट्या आल्या होत्या. पण, यंदा सध्या केवळ १५० ते २०० पेट्यांचीच आवक होत आहे. बदलत्या हवामानामुळे आंबा उत्पादनात घट झाल्याने आवक अत्यल्प आहे. त्यामुळे, गुढीपाडव्याला आंब्यांचे दर तेजीत राहणार आहेत, असे मार्केटयार्डातील आंबा व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
कोकणातील आंबा उत्पादनात तब्बल ६० ते ७० टक्क्यांची घट झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हवामानातील सातत्याने बदलणारे स्वरूप, परतीच्या पावसाचा परिणाम, थ्रिप्स आणि तुडतुड्या (हॉपर) या किडींच्या प्रादुर्भावामुळे आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत. यंदा कोकणात पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यामुळे जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहिला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ऑक्टोबरपर्यंत वातावरण थंड राहिल्याने आंब्याच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. त्यानंतर हवामानात बदल झाल्याने मोहोर गळून गेला, फळांची वाढ खुंटणे आणि गुणवत्तेत घट होणे असे परिणाम दिसून आले आहेत.
परिणामी यंदा केवळ ३० ते ४० टक्के एवढेच उत्पादन मिळाले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर आंब्यांचे दर जास्त वाढणार आहेत. त्यानंतर आंब्यांची आवक जास्त होईल.