रविवारी भाजीपाला घेऊन घरी जाताना ऑइल टँकरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी, ता. १६ - वाकड-हिंजवडी रस्त्यावरील विनोदेनगर चौकात ऑइल टँकरखाली सापडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला आहे. अजयसिंग भदोरिया (वय-३८, रा. भूमकरवस्ती, वाकड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आरोपी टॅंकर चालक अमोल खेडकर (वय - ३१, रा. अहिल्यानगर) याला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजयसिंग हे भाजीपाला घेऊन घरी जात होते. तेव्हा लक्ष्मी चौक हिंजवडीकडून डांगे चौकाकडे जाणाऱ्या ऑइल टँकरने (क्रमांक एमएच ४६-सीई-१५४७) अजयसिंग यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
अजयसिंग खाली पडून टँकरच्या मागील चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अजयसिंग हे एका दूरसंचार कंपनीत नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे.