हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये आता अधिक स्वच्छ, सुरक्षित अन्न मिळणार
सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लाऊड किचन्स, अन्न सेवा आस्थापनांसाठी सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश जारी
पुणे, ता. २५ - अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लाऊड किचन्स व अन्न सेवा आस्थापनांसाठी सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश जारी केला आहे. त्यानुसार, अन्नसुरक्षा व मानके कायदा-२००६ अंतर्गत असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी आता बंधनकारक करण्यात आली आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लाऊड किचन्स व अन्न सेवा आस्थापनांच्या राज्यभरातील तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. अस्वच्छ, कीटकग्रस्त स्वयंपाक घरे, वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर, वैद्यकीय तपासणी नसलेले कर्मचारी, चुकीचे पॅकेजिंग व तापमानातील त्रुटी, पाण्यासाठी ग्राहकांवर सक्ती केल्याचे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना तक्रार करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन तसे मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या जवळच्या कार्यालयात तक्रार करता येणार आहे.
जारी केलेल्या आदेशानुसार, सुरक्षित पिण्याचे पाणी हा आता मोफत मिळणार आहे. बाटलीबंद पाण्याची सक्ती करता येणार नाही,
वर्तमानपत्रात अन्न देण्यास बंदी घालण्यात आली असून फक्त फूड-ग्रेड पॅकेजिंगला परवानगी आहे, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी व FoSTaC प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे, वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापरावर कठोर निर्बंध घातले आहेत, मेनूवर कॅलरी, अॅलर्जन व शाकाहारी/मांसाहारी माहिती असणे बंधनकारक आहे. वार्षिक ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या अन्न व्यवसायांना एफएसएसएआय मान्यताप्राप्त संस्थेमार्फत दरवर्षी अन्नसुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचे लेखापरीक्षण करून घ्यावे लागणार आहे. सुरक्षित अन्न हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, असे अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे.
- हे नियम कोणाला लागू?
▶ हॉटेल्स रेस्टॉरंट्स ढाबे कॅन्टीन कॅफेटेरिया
बेकरी व मिठाई दुकानं केटरिंग फूड कोर्ट
ज्यूस बार क्लाऊड/डार्क/सेंट्रल किचन
साखळी ब्रँड्स - ऑनलाइन फूड Apps
- नियम मोडल्यास कठोर कारवाई
असुरक्षित अन्नामुळे मृत्यू ७ वर्ष ते जन्मठेप + ₹१० लाखांवर दंड
परवान्याशिवाय व्यवसाय / दिशाभूल जाहिरात ₹१० लाखांपर्यंत
अवमानक (substandard) अन्न २५ लाख . अस्वच्छ प्रक्रिया ₹१ लाख
▶ पुनरावृत्ती
दुप्पट दंड + परवाना निलंबन/रद्द
- तक्रार कुठे करावी?
काही चुकीचं दिसलं? तक्रार करा !
अन्न व औषध प्रशासन : टोल-फ्री: १८०० २२२ ३६५
FSSAI हेल्पलाईनः १८०० ११४०००
FOSCOS : मोबाईल APP
जवळचं विभागीय अन्न व औषध प्रशासन कार्यालय
तुमची एक तक्रार अनेकांचं आरोग्य वाचवू शकते.