काळेवाडीत व्यावसायिक आणि भावाला मारहाण; वाहनांच्या काचा फोडल्या

काळेवाडीत व्यावसायिक आणि भावाला मारहाण; वाहनांच्या काचा फोडल्या

काळेवाडी | ९ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात दुकान बंद करून घरी जाणाऱ्या व्यावसायिकाला आणि त्यांच्या भावाला चौघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ आणि धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना दांडक्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी आणि टेम्पोच्या काचा फोडून नुकसान केल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी निरजकुमार योगेंद्र शर्मा (वय ४४ वर्षे, थेरगाव, पुणे; मूळगाव शर्मा, ता. घोसी, जि. जहानाबाद, बिहार) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात प्रतिक बाबर, विकी, सुलतान आणि क्रिश या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी, सुलतान आणि क्रिश यांची पूर्ण नावे व पत्ते तक्रारीत नमूद नाहीत.

ही घटना ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथील महाराजा हॉटेलजवळ असलेल्या जीप केअर जिप्सम इंटेरिअर नावाच्या दुकानाजवळ घडली.

फिर्यादी आणि त्यांचा भाऊ दुकान बंद करून घरी जात असताना आरोपी प्रतिक बाबर आणि त्याच्या तीन साथीदारांनी फिर्यादी यांच्या तोंडओळखीचा फायदा घेत त्यांना हाताने मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकाराबाबत विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी यांच्याशी वाद घालून पुन्हा शिवीगाळ केली. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी दुकानात काम करणारे क्रिश बघेल आणि धीरज बघेल यांना दांडक्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच दुकानाबाहेर उभ्या असलेल्या फिर्यादी यांच्या चारचाकी वाहनाच्या पाठीमागील काचेवर दांडक्याने प्रहार करून काच फोडण्यात आली.

याशिवाय रस्त्यावर उभ्या असलेल्या धीरज मोहन पुरवस्वानी यांच्या टेम्पोच्या ड्रायव्हर साईडची काच फोडून नुकसान करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार नलावडे करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories