मावळच्या इंदुरी येथे एसबीआय एटीएममध्ये दोन अनोळखी व्यक्तींनी डेबिट कार्डची अदलाबदल करून महिलेच्या खात्यातून २६ हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने गंडा घालण्याचा प्रकार सुरूच आहे. इंदुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेचे डेबिट कार्ड हातचलाखीने बदलून तिच्या खात्यातून २६ हजार रुपये काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा अमोल सोनवणे (वय ३७, रा. इंदुरी) या २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत इंदुरी येथील हनुमान मंदिरासमोरील रस्त्यालगत असलेल्या एसबीआय एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी एटीएममध्ये आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर हातचलाखीने त्यांच्या डेबिट कार्डची अदलाबदल केली. या प्रकारानंतर आरोपींनी बदललेल्या कार्डचा वापर करून तक्रारदार महिलेच्या बँक खात्यातून दोन वेळा १० हजार रुपये आणि नंतर आणि ६ हजार रुपये अशी एकूण २६ हजार रुपयांची रक्कम काढली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उमा सोनवणे यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी २ नोव्हेंबर रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एटीएममध्ये पैसे काढताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अनोळखी व्यक्तींची मदत घेताना सावध राहावे आणि डेबिट कार्ड कोणाच्याही हाती देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.