वाकड परिसरात बेकायदेशीररीत्या पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान तरुणांकडून पोलिसांनी लोखंडी धातूचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि सॅमसंग मोबाईल असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर दुपारी दीडच्या सुमारास थेरगाव येथील पवना ब्रिजजवळ, चिंचवड-डांगे चौक रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण ढके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आदित्य शरद गुजरे (वय २९, रा. मुरबाड, जि. ठाणे) आणि गौरव राजू चोरगे (वय २३, रा. बोरी पारधी, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे लोखंडी धातूचे पिस्तूल, २ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आणि ८० हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाकड पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.