दुबईतून चालणाऱ्या ऑनलाइन सायबर फसवणूक रॅकेटचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश

दुबईतून चालणाऱ्या ऑनलाइन सायबर फसवणूक रॅकेटचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश

पिंपरी-चिंचवड | २ नोव्हेंबर २०२६ : ऑनलाइन फसवणुकीसाठी वापरण्यात येणारी बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या आणि त्यातून फसवणुकीची रक्कम परदेशात पाठवणाऱ्या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासात १५० पेक्षा जास्त बँक खाती आणि एक कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे. या रॅकेटचे धागेदोरे दुबईपर्यंत पोहोचले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बँक खात्यांची तपासणी सुरू करण्यात आली.

सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ४२/२०२६ च्या तपासादरम्यान एका बँक खात्याचा शोध घेण्यात आला. हे खाते तुषार अमराराम चौधरी (वय २९ वर्षे, रा. मोरे वस्ती, चिंचवड, पुणे) याच्या नावावर असल्याचे समोर आले. या खात्यात सायबर फसवणुकीची रक्कम जमा होऊन ती रोख स्वरूपात काढली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणाचा तपास पुढे नेत पोलिसांनी आदर्श संतोष वाघमारे (वय २७ वर्षे, रा. आकुर्डी, पुणे) याचाही शोध घेतला. तपासात तुषार चौधरी आणि आदर्श वाघमारे यांनी दुबईतील सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे (वय २६ वर्षे, रा. निगडी प्राधिकरण, पुणे) याच्या साथीने फसवणुकीतील रक्कम वळवल्याचे समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम बँक खात्यांमधून रोख स्वरूपात काढली जात होती. त्यानंतर ही रक्कम कमिशन घेऊन इतर बँक खात्यांतून सीडीएमद्वारे दुबईला पाठवली जात असल्याचे तपासात आढळले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून समोर आलेला सुमंत दसरे हा दुबईतून रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी केले. त्याआधारे इंटरपोलच्या मदतीने त्याला दुबईत ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावर आणून पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी त्याला अटक केली.

तपासात फसवणुकीची पद्धत उघड

प्राथमिक तपासात सुमंत दुसरे हा सुरुवातीला ६००० दिरहम मासिक पगारावर शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडसाठी कॉलिंग व मॅनेजिंगचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या कामातून त्याला फसवणुकीच्या रकमेतून चार टक्के कमिशन मिळत होते.

त्यानंतर त्याने चायनीज आरोपींकडून वेगवेगळी इंटरनॅशनल कार्ड्स घेऊन मॉल आणि इतर ठिकाणी महागड्या वस्तू खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. खरेदी केलेल्या वस्तू संबंधित व्यक्तींना देऊन त्या बदल्यात कमिशन मिळवले जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पुढे सुमंत दुसरे याने चायनीज आरोपींसोबत भागीदारीत सायबर गुन्ह्यांचे काम सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यातून त्याला फसवणुकीच्या रकमेतून २० टक्के कमिशन मिळत असल्याची माहिती आहे.

या कामासाठी तुषार चौधरी आणि आदर्श वाघमारे यांच्या माध्यमातून १५० पेक्षा जास्त बँक खाती उपलब्ध करून घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या खात्यांमधून आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या रॅकेटशी संबंधित आरोपींविरोधात हैदराबाद, तेलंगणा आणि काळेवाडी पोलीस ठाण्यांतही गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

तीन आरोपींना अटक; तपास सुरू

या प्रकरणात पोलिसांनी तुषार अमराराम चौधरी, आदर्श संतोष वाघमारे आणि सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे या तिघांना अटक केली आहे.

४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याचे पोलिसांनी कळवले असून, या रॅकेटमध्ये आणखी किती आरोपी सहभागी आहेत आणि इतर किती बँक खात्यांचा वापर झाला आहे, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories