तळेगाव दाभाडे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे एका अज्ञात दुचाकीस्वाराने एका जेष्ठ महिलेला धडक दिल्याची घटना घडली आहे. या जोरदार धडकेत महिलेच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरला सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील जय भवानी इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर हा अपघात घडला. तक्रारदार महिला (वय ५७) भाजीपाला घेण्यासाठी बाजारात गेली होती. यावेळी एका अज्ञात दुचाकीस्वाराने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत जेष्ठ महिलेला पाठीमागून धडक दिली.
या धडकेत महिलेच्या डाव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले, तर डाव्या पायाच्या गुडघ्याला खरचटून गंभीर दुखापत झाली. तक्रारीत, दुचाकीस्वार भरधाव वेगात मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवत होता, असे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.१३ वाजता तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर, अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
तसेच तळेगाव दाभाडे परिसरातील बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.