राज्य सरकार लवकरच पेट्रोल पंपांवर रॉकेल उपलब्ध करुन देणार
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची माहिती
पुणे, ता. १७ : आखाती देशांमधील युद्धामुळे आपल्या देशातही घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकार लवकरच पेट्रोल पंपांवरही रॉकेल उपलब्ध करुन देणार आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (ता. १६) विधानसभेत ही माहिती दिली.
'एलपीजी' गॅसच्या टंचाईवर तोडगा काढण्यासाठी भुजबळ यांनी सोमवारी 'बीपीसीएल', 'एचपीसीएल' आणि 'आयओसीएल' या प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तातडीची चर्चा केली. चर्चेनंतर सभागृहाला माहिती देताना ते म्हणाले की, ''राज्यातील घरगुती गॅसचे दैनंदिन उत्पादन नऊ हजार टनांवरून ११ हजार टनांपर्यंत वाढविले आहे. सद्यःस्थितीत घरगुती वापराच्या गॅसला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून उत्पादनातील तांत्रिक अडचणीही दूर केल्या जात आहेत. रॉकेलचा साठा मुबलक असून पेट्रोल पंपांवर लवकरच ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध सरकारने विशेष समित्या नेमल्या आहेत.''
"राज्यात रॉकेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, उज्ज्वला योजनेनंतर रॉकेलची जुनी वितरण साखळी विस्कळित झाली आहे. रॉकेल वितरकांचे जाळे सध्या सक्षम नसल्याने, ग्राहकांना थेट पेट्रोल पंपांवरुन रॉकेल दिले जाईल." असे भुजबळ यांनी सांगितले.