news
clock

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार विजयी 

अध्यक्षपदी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर यांची निवड

पुणे, ता. १६ - महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार विजयी झाली. अध्यक्षपदी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर यांची निवड झाली. 'मसाप'मध्ये दहा वर्षांनी हा सत्ताबदल  घडला आहे. 

परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी परिवर्तन उत्कर्ष आघाडी म्हणून निवडणूक लढवली आणि विरोधकांनी साहित्य संवर्धन आघाडी या नावाने निवडणूक लढवली. साहित्य संवर्धन आघाडीला भाजपच्या नेत्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला होता.

काल, रविवारी (ता. १५) पोलिस बंदोबस्तात निवडणुकीची मतमोजणी झाली.  सकाळी साडेअकरापासून मतमोजणी सुरु झाली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास मतमोजणी संपल्यानंतर निकालाची घोषणा झाली.  अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह व कोषाध्यक्ष या पदांसाठी निवडणुक लढवताना साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण, स्वाती महाळंक व प्रदीप निफाडकर यांनी प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आणि विनोद कुलकर्णी यांचा पराभव केला. पुण्यातील सात स्थानिक कार्यवाह पदांमध्ये संमिश्र निकाल लागला. यात परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे तीन आणि विरोधकांच्या साहित्य संवर्धन आघाडीचे चार उमेदवार निवडून आले. पुणे जिल्हा प्रमुख पदांवर परिवर्तन उत्कर्ष आघाडीचेच तीन उमेदवार निवडून आले.

या निवडणुकीत अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह व कोषाध्यक्ष या पदांसाठी एकूण १६ हजार ६०७ मतांपैकी १० हजार ९०१ मतदान झाले.  यातील १० हजार ७१३ मते वैध ठरली, १८८ अवैध ठरली. पुण्यातील स्थानिक कार्यवाह पदांसाठी १६३१ तर पुणे जिल्हा प्रमुख पदासाठी १५०६ एवढे मतदान झाले. 

या निवडणुकीसाठी अॅड. प्रताप परदेशी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी होते.  संजीव खडके आणि गिरीश केमकर यांनी सह निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.


निकाल दृष्टीक्षेपात - 

अध्यक्ष - योगेश सोमण (मते ५३६५) विजयी, विरुद्ध प्रा. मिलिंद जोशी (मते ५३२०)

प्रमुख कार्यवाह - स्वाती महाळंक (मते ५४१४) विजयी, विरुद्ध सुनीताराजे पवार (मते ५२८५)

कोषाध्यक्ष - प्रदीप निफाडकर (मते ५५३६) विजयी, विरुद्ध विनोद कुलकर्णी (मते ५१६८)

पुणे स्थानिक कार्यवाह -

सुनील महाजन - ८३९ मते (साहित्य संवर्धन)

अंजली कुलकर्णी - ८०८ मते (परिवर्तन उत्कर्ष)

सुनेत्रा मंकणी - ८१४ मते (साहित्य संवर्धन)

प्रसाद मिरासदार - ८३९ मते (साहित्य संवर्धन)

माधव राजगुरू - ७६६ मते (परिवर्तन उत्कर्ष)

नितीन संगमनेरकर ८०७ मते (साहित्य संवर्धन)

डॉ. आशुतोष जावडेकर ८४७ मते (परिवर्तन उत्कर्ष)

पुणे जिल्हा प्रमुख -

पुरुषोत्तम काळे (परिवर्तन उत्कर्ष) - १२६४ मते

प्रभाकर ओव्हाळ (परिवर्तन उत्कर्ष) - १२५० मते

राजन लाखे (परिवर्तन उत्कर्ष) - १०४२ मते


परिषदेत नियमानुसारच कामकाज होईल....

साहित्य संवर्धन आघाडी ही समविचारी साहित्यप्रेमी आणि वाचककेंद्रित अशी आघाडी होती. निवडणुकीत आमचे उमेदवार बहुमताने विजयी झाले, याचा आनंद आहे. आमच्या आघाडीसाठी काम केलेल्या सर्वांचा हा विजय आहे. त्यांना हा विजय समर्पित करतो. यापुढे महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये कायद्याप्रमाणे, नियमानुसारच कारभार होईल.

- योगेश सोमण,  महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories