थरमॅक्स चौकात मॅनेजरला मारहाण करून 7 हजार रुपये लुटले; दोघांवर गुन्हा

थरमॅक्स चौकात मॅनेजरला मारहाण करून 7 हजार रुपये लुटले; दोघांवर गुन्हा

चिंचवड | 12 सप्टेंबर 2026 : पैशांची मागणी पूर्ण करण्यास नकार दिल्याने एका खासगी कंपनीतील मॅनेजरला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच प्लास्टिकची खुर्ची आणि लोखंडी स्टूलने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या शर्टाच्या खिशातील सात हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार चिंचवडमधील थरमॅक्स चौक परिसरात घडला.

ही घटना 10 सप्टेंबर 2026 रोजी रात्री नऊच्या सुमारास थरमॅक्स चौकातील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या साईलीला लॉजसमोर घडली. याप्रकरणी विशाल भारत कापरे (वय 31, व्यवसाय-मॅनेजर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घटनास्थळी बसलेले असताना आकाश उर्फ बाबा उत्तम शिनगारे आणि त्याचा एक अनोळखी साथीदार त्यांच्याजवळ आले. दोघांनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर दोघांनी संगनमताने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घटनास्थळी असलेल्या प्लास्टिकच्या खुर्चीने आणि लोखंडी स्टूलनेही त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीदरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या शर्टाच्या खिशात असलेली सात हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेल्याचे सांगण्यात आले आहे.

मारहाण सुरू असताना परिसरातील काही नागरिक फिर्यादीला वाचविण्यासाठी पुढे आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही धमकावून परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी तेथून निघून गेले.

याप्रकरणी आकाश उर्फ बाबा उत्तम शिनगारे (वय 30  रा.चिखली ) आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 713/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories