महापौरांनी रद्द केला परदेश दौरा, आता देशांतर्गत दौरा करणार, आठवड्यातून एक दिवस सायकलवरुन महापालिकेत येणार
महापौरांनी रद्द केला परदेश दौरा, आता देशांतर्गत दौरा करणार, आठवड्यातून एक दिवस सायकलवरुन महापालिकेत येणार
पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे यांनी दिली माहिती, नगरसेवक-अधिकारी-नागरीकांना सायकल व सार्वजनिक वाहतूकीच्या वापराचे आवाहन
पिंपरी, ता. १४ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी त्याचा १७ ते २२ मे या कालावधीत पश्चिम आशियातील अझरबैजान देशाची राजधानी बाकू येथे येथे होणारा परदेश दौरा रद्द केला आहे. ही माहिती त्यांनी गुरुवारी (ता. १४) पत्रकार पदिषदेत दिली. यावेळी ''मी उद्यापासून आठड्यातून एक दिवस सायकलने महापालिकेत येईन व घरी जातानाही सायकलनेच जाईन'', असे जाहीर केले आणि नगरसेवकांनीही महापालिकेत येताना-जाताना आठवड्यातून एकदा सायकल किंवा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करण्याचे आवाहन केले.
महापौर लांडगे म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत करण्यासाठी सायकल किंवा सार्वजनिक वाहतूकीचा वापर करण्याचे आवाहन केले. आपल्या देशातील चलन आपल्या देशातच राहावे व स्वदेशी पर्यटनाला चालना मिळावी यासाठी परदेश दौरे करु नयेत असे आवाहन केले. सरकारी अधिकाऱ्यांनी वाहनांचा मर्यादित वापर करावा आणि इलेक्ट्रिक वाहने वापरण्याला प्राधान्य द्यावे असे सांगितले आहे. या आवाहनानुसार १७ ते २२ मे दरम्यान पश्चिम आशियातील अझरबैजान देशाची राजधानी बाकू येथे होणारा वर्ल्ड अर्बन फोरमचा दौरा मी रद्द करत आहे.''
पुढे ते म्हणाले, '' मी स्वतः उद्या सायकलवरुन महापालिकेत येणार आहेत. परतही सायकलवरुन जाणार आहे आणि हे मी आठवड्यातून एकदा अवलंबणार आहे. नगरसेवक व अधिकाऱ्यांनी महापालिकेत येताना व परत जाताना आठवड्यातून एकदा सायकल किंवा इलेक्ट्रिक वाहन किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करावा.
नागरीकांनीही पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सार्वजनिक वाहतूकीचा अधिकाधिक वापर करावा. ''
याशिवाय, शुक्रवारी (ता. १५) होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चिला जाणारा इंधनभत्त्यातील वाढीचा प्रस्ताव आम्ही रद्द करत आहोत. तसेच एकाच भागात राहणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी एकच इलेक्ट्रिक कार द्यावी, अशी शिफारस आयुक्तांना केली आहे, असे महापौर लांडगे यांनी सांगितले.
देशांतर्गत दौरा करणार -
''नियोजित परदेश दौऱ्यात शिकण्यासारखे खूप होते. आपल्या संकल्पना मांडण्याची व नवीन संकल्पना जाणून घेण्याची या परदेश दौऱ्यात मोठी संधी होती. जगभरातील जाणकार तेथे येणार असल्याने मलाही या दौऱ्यासाठी उत्साह होता. पण, इंधनबचत व अधिकचा खर्च टाळण्यासाठी हा दौरा मी रद्द करत आहे. मी आपल्या देशातील एखाद्या शहराच्या दौऱ्यावर जाईन व तेथील कार्यपद्धती जाणून घेईन व आपल्या शहरात अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करेन.'' - महापौर रवी लांडगे