निगडीमध्ये स्पा-सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा, पिडीत महिलांची सुटका
Mar 17 2026
26
निगडीमध्ये स्पा-सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय, पोलिसांचा छापा, पिडीत महिलांची सुटका
पिंपरी, ता. १७ - भक्ती-शक्ती चौक-निगडी येथील व्हिजन प्लस मॉलमध्ये ब्लू बिल्स स्पा-सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे सोमवारी (ता. १६) उघड झाले. इथे काम करणाऱ्या दोन पिडीत महिलांची देहूरोड पोलिसांनी सुटका केली आहे व स्पा सेंटर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पोलिस हवालदार भगवंता चिंधु मुठे यांनी फिर्याद नोंदवली आहे. आरोपी अमोल खंडु जाधव (वय-४० वर्षे) हा स्पा-सेंटरच्या नावाखाली दोन पिडीत महिलांना पैशाचे आमिष दाखवुन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होता. त्यातून मिळालेल्या रक्कमेतून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता. या स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी दोन पिडीत महिलांची सुटका केली आहे व एकूण २०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून तो सध्या निगडीमध्ये राहत आहे. आरोपी विरोधात पोलिसांनी देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.