निगडी-प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्पाबाबत स्थानिक नागरीकांची महापौरांसोबत बैठक,
Mar 17 2026
40
निगडी-प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्पाबाबत स्थानिक नागरीकांची महापौरांसोबत बैठक,
महापौरांकडून प्रकल्पाचे काम तात्पुरते थांबवण्याचे निर्देश
पिंपरी, ता. १७ - निगडी-प्राधिकरणात साकारत असलेल्या हरित सेतू प्रकल्पाला नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. याबाबत नागरीकांची महापौर रवी लांडगे यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये नागरिकांचे म्हणणे ऐकल्यानंतर महापौरांनी अंतरिम दिलासा म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना हरित सेतू प्रकल्पाचे काम तात्पुरते थांबवण्याचे तोंडी आदेश दिले. संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली. नागरीकांनी हरित सेतू प्रकल्पाबद्दलच्या सर्व गोष्टींची महापौरांशी सविस्तर चर्चा केली. बैठकीला महानगरपालिकेचे अधिकारी बापू गायकवाड, सुनील पवार आणि प्रसन्न देसाई उपस्थित होते. माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांच्यासह एनपीआरएफ (NPRF) फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश शिंदे, अर्जुन दलाल, विजय नाईक,अतुल भोंडवे, प्रतिभा जोशी दलाल, धनंजय काळभोर,विलास कुटे, चंद्रकांत कोठारी, झिशान सय्यद, विजय शेटे,बाळा दानवले, रवींद्र हिंगे, योगेश शिंदे, पुनम शिंदे, नितीन कुंभार, सूर्यकांत मुथीयान, अश्विन खरे, शंतनू पेंडसे, सुनील पाटील, दिलीप मोरे आणि संतोष काळभोर हे निगडी-प्राधिकरणातील नागरीक बैठकीला उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली. ती म्हणजे, काही नगरसेवकांनी आठवडाभरापूर्वी महापौरांनी स्थगित केलेला प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची विनंती केली आहे. आंदोलनाच्या वेळी नागरिकांसोबत उपस्थित राहून नागरीकांना पाठिंबा दर्शवणारे काही लोकप्रतिनिधीच नंतर प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे, हरित सेतू प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्टपणे नागरीकांसमोर मांडावी आणि सर्व संबंधितांसोबत बैठक घेऊन गैरसमज दूर करावेत, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
नागरीकांचे म्हणणे ऐकल्यानंतर महापौरांनी हरित सेतू प्रकल्पाचे काम तात्पुरते थांबवण्याचे तोंडी आदेश दिले. लवकरच प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन प्रकल्पाचा आढावा घेण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यानंतर नागरिकांसमवेत पुन्हा एक बैठक आयोजित करुन पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.