पिंपरी-चिंचवड | 10 सप्टेंबर 2026 : शाळा आणि महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटची विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. मे ते ऑगस्ट 2026 या कालावधीत महापालिकेच्या सहकार्याने एकूण 72 पानटपऱ्यांवर निष्कासन कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना अशा पानटपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार स्थानिक पोलीस आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली. परिमंडळ एकमध्ये 17, परिमंडळ दोनमध्ये 18, परिमंडळ तीनमध्ये 23 आणि परिमंडळ चारमध्ये 17 पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे . चारही परिमंडळांमध्ये मिळून एकूण 72 पानटपऱ्यांचे निष्कासन करण्यात आले.
शालेय वयात मुलांमध्ये अनुकरण करण्याची प्रवृत्ती अधिक असते. शाळेत येता-जाता सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची आकर्षक पाकिटे दिसणे किंवा इतरांना त्यांचे सेवन करताना पाहणे यामुळे मुलांमध्ये कुतूहल निर्माण होऊन व्यसनाची सवय लागण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. व्यसनासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने चोरी, खोटे बोलणे किंवा शाळा बुडवणे अशा सवयी लागू शकतात. शाळांच्या प्रवेशद्वारांजवळ होणारी गर्दी, धुराचे लोट आणि असभ्य भाषेमुळे विशेषतः विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संबंधित परिमंडळांचे पोलीस उपायुक्त, पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी आणि महापालिकेच्या पथकांनी मोहिमेत सहभाग घेतला.
नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारची कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.