पिंपरी | १४ नोव्हेंबर २०२६ : दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजू मुलांपर्यंत पोहोचविण्याचा सामाजिक उपक्रम पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबविला. महाविद्यालयाच्या ‘दीपोत्सव’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आकाशकंदील आणि रंगवलेल्या दिव्यांची विक्री करून जमा झालेला निधी अनाथ आश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट दिला. तसेच आश्रमातील मुलांसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी आणि मानवतावादी मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने पीसीसीओईआर महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून अॅप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभागांतर्गत एफईएसए आणि लाईफ स्किल्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दीपोत्सव’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा वापर करून आकर्षक आकाशकंदील आणि हाताने रंगवलेले दिवे तयार केले. त्यानंतर या वस्तूंची विक्री करून निधी जमा करण्यात आला.
या उपक्रमातून जमा झालेला निधी पिंपरी-चिंचवड येथील संत मोणी बाबा अनाथ आश्रम आणि झुंज दिव्यांग संस्था यांना दिवाळी भेट म्हणून देण्यात आला. याशिवाय महाविद्यालयाच्या वतीने आश्रमासाठी धान्य, किराणा साहित्य, मिठाई आणि इतर आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आश्रमातील मुलांसोबत विविध खेळ खेळले. त्यांच्याशी संवाद साधत दिवाळीचा आनंद साजरा केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना समाजातील गरजू घटकांच्या गरजा समजून घेण्याची आणि प्रत्यक्ष सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली.
या उपक्रमात पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभागप्रमुख प्रा. शीतल पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रिया ओघे, प्रा. निलेश ठुबे, प्रा. वैशाली निंबाळकर, प्रा. रूपाली पाटील, प्रा. गजानन जाधव आणि प्रा. राजेश पाटील यांनी सहभाग घेतला.
तसेच विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ तावरे, संस्कृती बिरादार, निमिष कदम, सार्थक आटोळे, कुणाल तायडे, अथिला पाटील, संजना गाडगे आणि समृद्धी लांडे यांनी उपक्रमाच्या आयोजनात सहभाग नोंदविला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सेवाभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने पीसीसीओईआरचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. स्वतःच्या कलेतून निधी उभारून गरजूंपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून दिला.