पिंपरी | १३ नोव्हेंबर २०२६ : निःस्वार्थ प्रेम, करुणा, मानवसेवा आणि आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून देश-विदेशात मानवतेचा संदेश पोहोचविणाऱ्या माता अमृतानंदमयी देवी (अम्मा) यांना मराठी पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक आणि सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता निगडीतील यमुनानगर येथील माता अमृतानंदमयी मठात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अम्मा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुढारी माध्यम समूहाचे अध्यक्ष डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव असणार आहेत.
या कार्यक्रमाला विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, लोकप्रतिनिधी, उद्योजक तसेच सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये दैनिक सकाळच्या संपादक शीतल पवार, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी पुणेचे संपादक सुनील माळी, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या संपादक वृषाली कदम आणि दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळ्ये यांचा समावेश आहे.
तसेच आमदार महेश लांडगे, शंकर जगताप आणि सुनील शेळके, व्ही. जे. डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जावडेकर, कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
माता अमृतानंदमयी देवी यांनी प्रेम, माया, करुणा आणि निःस्वार्थ सेवेच्या माध्यमातून मानवतेचा संदेश दिला आहे. समाजातील गरजू आणि वंचित घटकांसाठी त्यांनी विविध सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी सांगितले की, माता अमृतानंदमयी देवी यांच्या मानवसेवा आणि आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. मातृत्व, माणुसकी आणि निःस्वार्थ सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, हा या सन्मानामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पुरस्कार सोहळ्यास पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी केले आहे.