आळंदीत दोन लाखांच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; तिघांवर गुन्हा

आळंदीत दोन लाखांच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; तिघांवर गुन्हा

आळंदी | १४ नोव्हेंबर २०२६ : पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात दोन लाख रुपये उसने दिले नसल्याच्या रागातून एका २२ वर्षीय रिक्षाचालकावर तिघांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला शिवीगाळ आणि दमदाटी करत त्याच्या पोटात, डोक्यात तसेच शरीराच्या इतर भागांवर सपासप वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आळंदी येथील नगरपरिषद इमारतीसमोर, कमानीजवळील पीएमटी चौकात घडली.

या प्रकरणी सागर दत्ता बडे (वय २२ वर्षे, व्यवसाय रिक्षाचालक, सध्या राहणार देहू फाटा, मूळ  शिरूर, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यात पिल्या ऊर्फ आर्यन नागोराव पंडित (वय २० वर्षे, राहणार नगरपरिषद झोपडपट्टी, आळंदी, तालुका खेड, जिल्हा पुणे), नव्या ऊर्फ नवनाथ जाधव (वय १९ वर्षे, राहणार इंद्रायणी नगर, चोवीसावाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे) आणि वैभ्या ऊर्फ वैभव व्यवहारे (वय २० वर्षे, राहणार केळगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, ते त्यांच्या मालकीची ऑटो रिक्षा क्रमांक MH-12 LM-4603 घेऊन व्यवसायासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी तिघांनी संगनमत करून फिर्यादीजवळ येत त्यांना घेरले.

आरोपी क्रमांक एक यास दोन लाख रुपये उसने दिलेले मागत असल्याचा राग मनात धरून तिघांनी फिर्यादीशी भांडण केले. त्यानंतर शिवीगाळ आणि दमदाटी करत आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी खंजीर आणि धारदार शस्त्राने फिर्यादीच्या पोटात, डोक्यात तसेच शरीराच्या इतर अवयवांवर जोरदार वार केले.

या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. आरोपींनी संगनमत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.  याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ आणि २७, महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७(३) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टचे कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories