वाकड | १४ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरातील पु. ना. गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्समध्ये सणासुदीच्या गर्दीचा फायदा घेत कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्यांमध्ये ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून ६ लाख ३८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून, चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून ३३ मिनिटांच्या सुमारास वाकड येथील भुमकर चौकातील पीएनजी ज्वेलर्समध्ये ग्राहकांची गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर हातचलाखीने ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे २९.८४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वी १९ एप्रिल २०२६ रोजी याच ज्वेलर्समध्ये अशाच पद्धतीने चोरी झाली होती. आरोपींनी दुकानातील गर्दीचा फायदा घेत कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ११.३७६ ग्रॅम वजनाचे शॉर्ट मंगळसूत्र चोरले होते. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २१२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सुरुवातीला आरोपींचा ठोस सुगावा लागत नव्हता. मात्र, तपास पथकाने वाकड ते कोंढवा आणि केशवनगर परिसरातील सरकारी तसेच खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासातून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. पोलिसांचा सुगावा लागल्याने आरोपी दुसऱ्या राज्यात जाऊन लपून बसल्याची माहिती तपासात समोर आली. मात्र, आरोपी महाराष्ट्रात परतल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत धनराज विजय परमार (वय ४८ वर्षे, राहणार केशवनगर, मुंढवा, पुणे) याला ११ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर सुचित्रा किशोर साळुंखे (वय ७५ वर्षे, राहणार शिंदेवस्ती, केशवनगर, पुणे) हिला १२ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी घेऊन चौकशी केली. त्यानंतर दोन्ही गुन्ह्यांतील चोरीस गेलेले एकूण ६ लाख ३८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, पोलीस उपनिरीक्षक मारणे तसेच तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करीत आहेत.