पिंपरी-चिंचवडमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या बीडमधील दोन सराईत गुन्हेगारांना अटक, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पिंपरी, ता. २० - पिंपरी-चिंचवड शहर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातील सराईत दोन साखळी चोरांना अटक केली आहे. या आरोपींकडून २८ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम वजनाचे ४ लाख १० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह ५ लाख ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात या आरोपींनी पिंपरी-चिंचवडमध्ये केलेले ४ चेन स्नॅचिंगचे गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत.
८ फेब्रुवारी २०२६ ला दिघी व पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक पल्सर मोटर सायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलांच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारुन चोरी करुन नेले होते. त्यानुसार, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने आरोपी आलेल्या व गेलेल्या मार्गावरील सुमारे २०० ते २५० सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता आरोपी गणेश भारत गिरी (रा. बीड) याने चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले व त्याला पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९ (४), ३ (५) नुसार अटक केली.
गणेश गिरीचा तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडुन सुरु करण्यात आला. तपासात आणखी तीन गुन्हे उघड झाले. तसेच गणेश गिरीकडून २८ ग्रॅम ५०० मिलीग्रॅम वजनाचे ४ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व चिखली येथे गुन्हे करताना वापरलेली १ लाख ५० हजार रुपये किंमतीची मोटर सायकल जप्त केली आहे.या गुन्ह्यांमध्ये गणेश याचे साथीदार रोहन राजु जाधव (रा. बीड), पंकज गणेश दिवटे (रा. बीड), सुमित सोपान चव्हाण (वय १९ वर्षे, सध्या रा. चाकण) व ओमकार रामेश्वर लाटे (रा. बीड) हेही सामील आहेत. सुमित सोपान चव्हाण याला ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी चिखली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार
सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग देवकाते, पोलिस हवालदार सोमनाथ मोरे व नितीन उमरजकर, पोलिस नाईक पवन वाजे व पोलिस शिपाई मोहसिन आत्तार या पथकाने केली आहे.
आरोपी गणेश गिरी याने खालील गुन्हे केल्याचे उघड झाले -
१. पिंपरी पोलीस स्टेशन, गु.र.नं. ७२/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५)
२. दिघी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. व कलम ६१/२०२६ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५)
३. निगडी पोलीस स्टेशन गुन्हा. रजि. नंबर ७५५/२०२५ बी.एन.एस.३०९ (६), ३(५), प्रमाणे.
४. चिखली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ८६९/२०२५ भा.न्या.सं.क. ३०९ (४), ३(५) प्रमाणे