महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील दुर्मिळ छायाचित्रे पाहण्याची संधी, महापालिकेतर्फे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील दुर्मिळ छायाचित्रे पाहण्याची संधी, महापालिकेतर्फे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
पिंपरी, ता. १३ - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महात्मा फुले व बाबासाहेबांच्या जीवनातील विविध महत्त्वपूर्ण प्रसंगांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पिंपरी चौकातील सावित्रीबाई फुले स्मारकाच्या आवारात ११ ते १५ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत हे प्रदर्शन शहरवासियांना पाहता येईल.
प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, कुशाग्र कदम यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विनय ओहोळ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
या प्रदर्शनातील दुर्मिळ छायाचित्र स्मृती नागार्जुन संग्रहालय, पत्रकार अश्विनी सातव व दिलीप वानखेडे यांनी उपलब्ध करुन दिली आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विवाह सोहळ्याचे क्षण, मुलींच्या शिक्षणासाठी सुरु केलेल्या पहिल्या शाळेतील अध्यापनाचे दृश्य, सावित्रीबाई फुले यांच्या वास्तव्याचे अवशेष, फुले दांपत्याच्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची छायाचित्रे, महात्मा फुले वाड्यातील दृश्ये तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक क्षण, बाबासाहेबांनी केलेले विविध सामाजिक आणि राजकीय सत्याग्रह, कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या ऐतिहासिक भेटी, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रसंग, घटना समितीच्या कामकाजातील सहभाग, मंत्रिपदाची शपथ घेतानाचे प्रसंग, बाबासाहेबांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे क्षण अशी अनमोल छायाचित्रे पाहण्याची संधी शहरवासियांना मिळणार आहे.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करुन, या दुर्मिळ छायाचित्रांच्या या प्रदर्शनाला नागरीकांनी आवर्जून भेट द्यावी. या महान समाजसुधारकांचे जीवन जाणून घ्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.