संघर्ष ते परिवर्तन: ‘महासूर्य’ने उलगडला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणादायी प्रवास
संघर्ष ते परिवर्तन: ‘महासूर्य’ने उलगडला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रेरणादायी प्रवास
महानाट्याच्या भव्य सादरीकरणाला प्रेक्षकांनी दिली भरभरून दाद; हजारो नागरिकांची उपस्थिती
पिंपरी, ता. १७ - समाजपरिवर्तनाचा इतिहास केवळ स्मरणात ठेवण्यापुरता नसून तो वर्तमानात जिवंत ठेवण्याची गरज आहे. याच जाणिवेतून साकारलेल्या ‘महासूर्य’ या भव्य महानाट्याने पिंपरी चिंचवडकरांना केवळ एक सांस्कृतिक अनुभव दिला नाही, तर सामाजिक समतेचा विचार अधिक ठामपणे मनात रुजवण्याचे काम केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सामाजिक समता सप्ताह’ व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत गुरुवारी, १६ एप्रिल रोजी पिंपरी येथील एच. ए. मैदान येथे ‘महासूर्य’ या महानाट्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या सादरीकरणात १०० हून अधिक कलाकारांचा समावेश होता.
‘महासूर्य’ या महानाट्याच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचे अत्यंत प्रभावी आणि अभ्यासपूर्ण सादरीकरण करण्यात आले. त्यांच्या वडिलांचे शिस्तबद्ध आणि मूल्यप्रधान व्यक्तिमत्त्व, बाबासाहेबांचा जन्म आणि बालपण, शिक्षणासाठीचा संघर्ष, अन्यायाचा सामना करत ज्ञानप्राप्तीसाठीची त्यांची अविरत धडपड यांचे हृदयस्पर्शी चित्रण साकारण्यात आले.
यामध्ये डॉ. बाबासाहेबांना शिक्षणासाठी मिळालेली मदत, परदेशातील शिक्षणाचा प्रवास, समाजातील वंचित घटकांच्या हक्कांसाठी उभारलेले आंदोलन, ‘मूकनायक’ या साप्ताहिकाची स्थापना, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह यांसारख्या ऐतिहासिक घटनांचे प्रभावी दृश्यरूप सादर करण्यात आले. तसेच पूना कराराच्या पार्श्वभूमीवर घडलेले प्रसंग आणि त्यातून उभे राहिलेले सामाजिक-राजकीय परिणाम यांचे संतुलित व वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले. याशिवाय, डॉ. बाबासाहेबांच्या वैयक्तिक आयुष्यातील रमाबाई आंबेडकर यांच्यासोबतचा सहजीवन प्रवास, त्यांच्या संघर्षातील साथ आणि त्याग यांचेही भावनिक चित्रण या महानाट्यातून उलगडण्यात आले.
सम्यक थिएटर, नागपूर प्रस्तुत या महानाट्याचे लेखन व दिग्दर्शन प्रा. सुनील रामटेके यांनी केले असून, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या भारदस्त आणि प्रभावी आवाजातील निवेदनामुळे संपूर्ण सादरीकरण अधिक उंचीवर गेले. उत्कृष्ट प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था, पार्श्वसंगीत, वास्तवदर्शी वेशभूषा आणि नेपथ्य यांचा उत्कृष्ट समन्वय साधत प्रत्येक प्रसंग प्रभावीपणे उभा करण्यात आला. काही दृश्यांमध्ये वापरण्यात आलेल्या विशेष प्रकाश प्रभाव आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सादरीकरण अधिक भव्य आणि आकर्षक झाले.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. विविध वयोगटातील प्रेक्षकांनी इतिहासाचा हा जिवंत अनुभव घेत सामाजिक समतेच्या विचारांशी नव्याने नाळ जोडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय पुन्हा एकदा नागरिकांना आला.
‘ट्रिब्युट टू महात्मा फुले अँड डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ द्वारे महामानवांचा उलगडला जीवनपट
राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. सय्यद पाशा आणि भारतातील नामवंत दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या विशेष कार्यक्रमातून महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘विचार प्रबोधन पर्वा’त नृत्य आणि नाटकाच्या माध्यमातून अनोखे अभिवादन करण्यात आले. ‘मिरॅकल ऑन व्हील्स’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी नृत्य आणि नाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचा प्रभावी उलगडा केला. त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग साकारत त्यांनी सामाजिक अन्यायाविरुद्धचा संघर्ष, शिक्षणाचा प्रसार आणि समतेचा विचार प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडला. विशेष म्हणजे, व्हीलचेअरवर आधारित नृत्य सादरीकरणातून कलाकारांनी आपल्या कलेची वेगळी उंची गाठत प्रेक्षकांना थक्क केले. या सादरीकरणात जिद्द, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रभावी संगम पाहायला मिळाला. या कार्यक्रमातून दिव्यांग कलाकारांच्या असामान्य प्रतिभेचे प्रभावी दर्शन घडले, तसेच समाजात समानता, सकारात्मकता आणि प्रेरणेचा संदेश अधोरेखित झाला. उपस्थित प्रेक्षक या सादरीकरणामुळे भारावून गेले असून कलाकारांच्या कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शौर्यगाथा महामानवांची कार्यक्रमाद्वारे साकारला संगीतमय अविष्कार
विचार प्रबोधन पर्वामध्ये लोककलेच्या समृद्ध परंपरेवर आधारित ‘शौर्यगाथा महामानवांची’ या कार्यक्रमामध्ये सुमारे ४० कलाकारांच्या सहभागातून पारंपरिक वाद्यवृंदाचा भव्य गीत-संगीतमय अविष्कार सादर करण्यात आला. विविध पारंपरिक वाद्यांच्या सुरेल संगतीत सादर झालेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांना भारतीय लोकसंस्कृतीची झलक अनुभवायला दिली. कलाकारांच्या एकसंध सादरीकरणातून इतिहास, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे प्रभावी चित्र उभे राहिले. महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या शौर्य, त्याग आणि प्रेरणादायी कार्याचा गौरवपूर्ण इतिहास या कार्य़क्रमातून मांडण्यात आला. संगीत, ताल आणि समूह सादरीकरणाच्या जोरावर कलाकारांनी प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडून ठेवले. या कार्यक्रमामुळे लोककलेचे जतन आणि संवर्धन होत असतानाच, सामाजिक जागृतीचा संदेशही प्रभावीपणे पोहोचवण्यात यश आले. शेखर नवतरे, प्रतीक्षा शीरसागर आणि सहकारी यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
‘निळी टोपी’ नाटकाने जिंकली उपस्थितांची मने
विचार प्रबोधन पर्वाच्या निमित्ताने आंडेकरवादी मंच, नांदेड यांच्या वतीने ‘निळी टोपी’ या आंबेडकर चळवळीवर आधारित नाटकाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या नाटकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदेशाचा प्रभावी उलगडा करण्यात आला. नाटकातील प्रभावी संवाद, कलाकारांचा दमदार अभिनय आणि सादरीकरणाची बांधणी यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यश आले. तसेच, समाजातील समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची जाणीव करून देत या सादरीकरणाने विचारांना चालना दिली. या नाटकाने उपस्थितांची मने जिंकली.