PCMC च्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाची COP31 हवामान परिषदेत दखल

PCMC च्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाची COP31 हवामान परिषदेत दखल

पिंपरी | १५ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाची संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत दखल घेण्यात आली आहे. तुर्कीये येथील अंटाल्या शहरात आयोजित UNFCCC COP31 परिषदेत या पर्यावरणपूरक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. स्थानिक पातळीवर पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्याने शहराच्या शाश्वत विकासाच्या वाटचालीला नवी ओळख मिळाली आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ९ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तुर्कीयेतील अंटाल्या एक्स्पो सेंटर येथे आंतरराष्ट्रीय हवामान परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत १४ नोव्हेंबर रोजी ‘हरित सेतू’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर या परिषदेत चर्चा होत आहे.

जागतिक स्तरावर हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि शाश्वत विकासाचे प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरणपूरक प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. युरोपमधील विविध कार्यक्रमांमध्येही ‘हरित सेतू’ प्रकल्पाची चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

महापालिकेने यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. केंद्र शासनाच्या ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’ उपक्रमात देशातील १०० शहरांमधून पिंपरी-चिंचवडने पहिल्या पाच शहरांमध्ये स्थान मिळवले होते. तसेच ‘पुणे ग्रँड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या आयोजनातही शहराचा सहभाग राहिला आहे.

या उपक्रमांमध्ये महापालिकेचे अधिकारी बापूसाहेब गायकवाड, सुनील पवार, अमित दीक्षित, स्वप्नील शिर्के, अनंत चिटके आणि प्रसाद देशमुख यांनी योगदान दिल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

महापौर रवि लांडगे यांनी ‘हरित सेतू’ प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होणे ही पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. शहराच्या विकासाबरोबरच भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, हरित आणि शाश्वत पर्यावरण निर्माण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. स्थानिक उपक्रमांना जागतिक व्यासपीठ मिळाल्याने पर्यावरणपूरक कामांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सह शहर अभियंता बापू गायकवाड यांनी शहराच्या विकासात पर्यावरणाचा समतोल राखणे महत्त्वाचे असून, ‘हरित सेतू’ प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली दखल पुढील कामांसाठी प्रोत्साहन देणारी असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories