रावेत | १५ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरात भरधाव कारने दोन रिक्षांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका रिक्षातील महिला प्रवासी जखमी झाली असून, दोन्ही रिक्षांचे नुकसान झाले आहे. दोन रिक्षांना धडक दिल्यानंतर संबंधित कार रस्त्यावर पलटी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात २३ वर्षीय कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांपासून १० वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान रावेत येथील नरसिंह चौक, ताथवडे ते समाधान हॉटेल मार्गावर घडली.
या प्रकरणी प्रदीप भागोजी सुरवसे (वय ३३ वर्षे, राहणार कोलते पाटील लेबर कॉलनीच्या बाजूला, पुनावळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, मूळ राहणार काकडदाती, तालुका परंडा, जिल्हा यवतमाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
अनुग्रह देविदास सूर्यवंशी (वय २३ वर्षे, राहणार गुरुप्रसाद होम्स, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पाठीमागे, हिंजवडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अनुग्रह सूर्यवंशी हा त्याच्या ताब्यातील हुंडाई व्हर्ना कार क्रमांक MH-26 AF-2758 घेऊन जात होता. त्याने कार भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून नरसिंह चौक येथील सिग्नलवर थांबलेल्या फिर्यादीच्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे फिर्यादीच्या रिक्षेचे नुकसान झाले. तसेच समोरील बाजूने उभ्या असलेल्या एका कारचे ही नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर आरोपीने कार पुढे नेऊन अजय राजनाथ जैस्वाल यांच्या रिक्षा क्रमांक MH-14 GC-5116 हिला धडक दिली. या धडकेमुळे संबंधित रिक्षेचेही नुकसान झाले.
दुसऱ्या धडकेनंतर आरोपीची कार रस्त्यावर पलटी झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या अपघातात फिर्यादीच्या रिक्षातून प्रवास करणाऱ्या लक्ष्मी संतोष बसल या महिला प्रवाशाच्या डाव्या भुवईला आणि छातीला दुखापत झाली.
या घटनेनंतर प्रदीप सुरवसे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ आणि १८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बाबर करीत आहेत.