मालमत्ता कर अभय योजना लवकरच लागू केली जाईल - आयुक्त श्रावण हर्डीकर 

शहरातील सुविधांबाबत आयु्क्तांची व महापौरांची बैठक, विविध मुद्यांवर चर्चा 

पिंपरी, ता. २६ - मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी आणि करदात्यांच्या सोईसाठी मालमत्ता कर अभय योजना लवकरच लागू केली जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. मालमत्ता कर अभय योजना प्रभावीपणे राबवावी, असा प्रस्ताव महापौर रवी लांडगे यांनी बैठकीत आयुक्तांपुढे मांडला होता. त्यावर आयुक्तांनी ही योजना लवकरच लागू करण्याचे आश्वासन दिले.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देणे, पर्यावरण संरक्षण आणि शहरातील मूलभूत सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस व कालबद्ध कार्यवाही करण्यासाठी महापौर लांडगे व आयुक्त हर्डीकर यांची बैठक झाली. 

या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कर अभय योजना राबवणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, ,इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता मोहीम, औद्योगिक सांडपाणी नियंत्रण करणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बळकटीकरण व शाश्वत संवर्धनासाठी व्यापक कृती आराखडा तयार करणे,भटक्या श्वानांच्या समस्येवर कायदेशीर चौकटीत सर्वसमावेशक उपाययोजना राबविणे, भटक्या श्वानांचे लसीकरण, नसबंदी, जनजागृती आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि भोसरीतील नवीन रुग्णालयाचे 'श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी नवीन भोसरी रुग्णालय' असे नामकरण करणे या विषयांवर चर्चा झाली. 

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी बचत उपाययोजना, गळती नियंत्रण, टँकर नियोजन, प्रलंबित व चालू पाणीपुरवठा प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याचे ठरले. तसेच, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, गटार दुरुस्ती व जलनिस्सारण व्यवस्थेची पूर्वतयारी काटेकोरपणे पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे ठरले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance