थकीत मालमत्ता करवसुलीसाठी महापालिकेची ‘अभय योजना’ १ मार्चपासून सुरु 

थकबाकी एकरकमी भरल्यास महापालिका कर बिलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत 

पिंपरी, ता. २७ -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी १ मार्च २०२६ पासून विशेष ‘अभय योजना’ सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी तसेच औद्योगिक व मोकळ्या जागा यांची थकबाकी एकरकमी भरल्यास महापालिका कर बिलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत दिली जाणार आहे. योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी लागू राहणार आहे. आर्थिक वर्ष २०२५ - २०२६ मधील थकबाकीसह संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यासच या सवलतीचा लाभ घेता येणार असून १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत पूर्ण भरणा करणे आवश्यक आहे.

 मालमत्ताकराची थकबाकी प्रलंबित असलेल्या मालमत्ताधारकांसाठी ही मोठी आर्थिक दिलासा देणारी योजना ठरणार आहे. आतापर्यंत शहरातील ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देत सुमारे ७४७  कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. वसुली मोहिमेला अधिक गती देण्यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत असून थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. तसेच वर्तमानपत्र, सोशल मिडीया व विविध माध्यमांद्वारे मालमत्ता कर भरण्याचे नागरिकांना आवाहन करणेत येत आहे. शहरातील एकूण २ लाख १२ हजार ४४० थकबाकीदारांनी अद्यापही थकीत मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. या थकबाकीदारांनी विलंब न करता त्वरित संपूर्ण रकमेचा भरणा करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

३१ मार्चपूर्वी थकीत मालमत्ता कर भरावा...

महापालिकेची ‘अभय योजना’ ही नागरिकांना दिलेला विश्वासाचा शब्द आहे. थकबाकीमुळे वाढलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी ९० टक्के  मनपा करावरील बिलंब दंडावर सवलत देण्यात येत आहे. शहराच्या विकासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही मर्यादित कालावधीची संधी साधून ३१ मार्चपूर्वी थकीत मालमत्ता कर भरावा.

रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका

मुदतीनंतर नियमित वसुली प्रक्रिया सुरु राहणार... 

१ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास मनपाकर शास्तावर ९० टक्के सवलत लागू होईल. ही योजना सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी लागू असून थकबाकीदारांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित भरणा करावा. मुदत संपल्यानंतर नियमित वसुली प्रक्रिया सुरु राहील.

श्रावण हर्डीकर , आयुक्त पिंपरी- चिंचवड महापालिका


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance