पिंपरी-चिंचवड | 15 सप्टेंबर 2026 : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 16 ते 29 सप्टेंबरदरम्यान मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37(1)(3) अन्वये हा आदेश जारी करण्यात आला असून, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी आदेश काढला आहे.
हा आदेश 16 सप्टेंबर रोजी पहाटे 12.01 वाजेपासून 29 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत विविध सण, उत्सव, जयंती-पुण्यतिथी तसेच 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
राजकीय पक्ष, सामाजिक संघटना किंवा इतर गटांकडून विविध मागण्यांसाठी मोर्चे, धरणे, निदर्शने, उपोषणे अथवा बंदची हाक दिली जाण्याची शक्यता असल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मनाई आदेशाच्या काळात दाहक अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ, दगड, शस्त्रे-अस्त्रे, फेकण्याची हत्यारे, काचेचे तुकडे किंवा रिकाम्या काचेच्या बाटल्या बाळगणे, जमा करणे अथवा तयार करणे प्रतिबंधित आहे. चाकू, सुरा, कोयता, तलवार, भाले, काठ्या, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू सोबत बाळगण्यासही बंदी राहील.
आक्षेपार्ह घोषणा देणे, सभ्यता व नीतिमत्तेला धोका निर्माण करणारी भाषणे करणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, शासकीय सेवेतील व्यक्ती तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 135 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी सण-उत्सवाच्या काळात शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.