‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात घराघरांत उजळणार स्वच्छतेचा दीप

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात घराघरांत उजळणार स्वच्छतेचा दीप

पिंपरी | १६ सप्टेंबर २०२६ : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा – २०२६’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी आपल्या घराची स्वच्छता करून सायंकाळी दिवा प्रज्वलित करावा आणि स्वच्छ, निरोगी जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांसह शहरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे महापालिकेने म्हटले आहे.

स्वच्छता ही केवळ सार्वजनिक ठिकाणांपुरती मर्यादित न राहता प्रत्येक घरातून आणि कुटुंबातून सुरू व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी घराची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश देणारा दिवा प्रज्वलित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे यांनी स्वच्छ शहराची सुरुवात घरापासून होत असल्याचे नमूद केले. प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण शहरावर होईल, असे त्यांनी सांगितले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वच्छता ही एका दिवसापुरती मोहीम नसून सातत्याने अंगीकारण्याची जीवनशैली असल्याचे सांगत नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले.

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नियमित स्वच्छतेच्या सवयींमुळे आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. तर उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी नागरिकांचा सहभाग हा अभियानाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट केले.

उपक्रमात सहभागी झाल्यानंतर नागरिकांनी swachhatahiseva.gov.in/citizen या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंद करावी. ‘सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करा’ हा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ हा उपक्रम प्रकार निवडून घराच्या स्वच्छतेनंतरचे छायाचित्र अपलोड करावे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहभागाचे प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.

नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत घराची स्वच्छता करून दिवा प्रज्वलित करावा आणि ऑनलाइन नोंद करावी, असे महापालिकेने आवाहन केले आहे. ‘माझे घर, माझी स्वच्छता; माझा सहभाग, माझी जबाबदारी’ या भावनेतून अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories