मालमत्ता कर ३० जूनपूर्वी भरा, सवलतींचा लाभ घ्या, महापालिकेचे आवाहन

मालमत्ता कर ३० जूनपूर्वी भरा, सवलतींचा लाभ घ्या, महापालिकेचे आवाहन

 मालमत्ता कर ३० जूनपूर्वी भरा, सवलतींचा लाभ घ्या, महापालिकेचे आवाहन 

३ लाख ६२ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी घेतला विविध सवलतींचा लाभ

पिंपरी, ता. २५ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सवलत योजनांना शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंत सुमारे ३ लाख ८० हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला असून त्यापैकी ३ लाख ६२ हजार ५७ मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ५ दिवसांचा कालावधी शिल्लक असून नागरिकांनी ३० जून  २०२६ पूर्वी कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा,  असे आवाहन महापालिकेने केले आहे.


महापालिकेकडून ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांसाठी विविध प्रोत्साहनपर सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑनलाईन आगाऊ कर भरण्यावर मिळणाऱ्या १० टक्के सवलतीला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून ३ लाख ८ हजार ४५३ मालमत्ताधारकांनी डिजिटल माध्यमातून कराचा भरणा केला आहे. यामुळे नागरिकांचा ऑनलाइन सेवांकडे वाढता कल स्पष्टपणे दिसून येत आहे.


याशिवाय आगाऊ कर भरणा, महिला मालमत्ताधारक, दिव्यांग, माजी सैनिक, शौर्य पदकधारक, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे तसेच प्रामाणिक करदाते अशा विविध गटांनाही महापालिकेच्या सवलत योजनांचा लाभ मिळाला आहे.

महापालिका क्षेत्रात सध्या ७ लाख ४४ हजारांहून अधिक मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ३ लाख ८० हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी आतापर्यंत ४३६ कोटी २० लाख रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. 


३० जूनपर्यंत लागू असलेल्या सवलतींचा लाभ घेतलेले मालमत्ताधारक


•ऑनलाईन आगाऊ भरणा – ३ लाख ८ हजार ४५३

•प्रामाणिक करदाता – ४६ हजार ९७३

•पर्यावरणपूरक सवलत – ४१ हजार ६४०

•आगाऊ भरणा – ३१ हजार ५११

•महिला – १६ हजार ३१४

•माजी सैनिक – ३ हजार ९९४

•दिव्यांग – १ हजार ७८२

•शौर्य पदकधारक – ३

एकूण लाभार्थी – ३ लाख ६२ हजार ५७

करदाता शहराच्या विकासाचा भागीदार 

''पिंपरी चिंचवडकरांनी वेळेत मालमत्ता कर भरून शहराच्या विकासात नेहमीच मोलाची भागीदारी नोंदवली आहे. यंदाही नागरिकांनी सवलत योजनांना दिलेला प्रतिसाद हा महापालिकेवरील विश्वासाचे प्रतीक आहे. प्रत्येक जबाबदार करदाता हा शहराचा विकास भागीदार आहे.''

- रवि लांडगे , महापौर, पिंपरी  चिंचवड महानगरपालिका.


करसंकलन मोहिमेस सहकार्य करावे

''मालमत्ता कर संकलनातील सातत्यपूर्ण वाढ ही महापालिकेच्या महसूल व्यवस्थापनाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. करदात्यांच्या सोयीसाठी विविध सवलती, ऑनलाइन करभरणा सुविधा तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उपलब्ध सवलतींचा लाभ अधिकाधिक मालमत्ताधारकांनी घ्यावा आणि ३० जूनपूर्वी मालमत्ता कराचा भरणा करून कर संकलन मोहिमेस सहकार्य करावे.''

-डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


सुट्टीच्या दिवशीही कर भरता येणार 

''मालमत्ताधारकांची वाढती संख्या लक्षात घेऊन करभरणा प्रक्रिया अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. ३० जून २०२६  पूर्वी जास्तीत जास्त नागरिकांना सवलतींचा लाभ मिळावा यासाठी शनिवार, रविवार तसेच शुक्रवारी मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील मालमत्ता कराचे कॅश काऊंटर सुरू राहणार आहेत. ''

-सचिन पवार , उपायुक्त , पिंपरी- चिंचवड महानगरपालिका




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories