पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय एकता दिन उत्साहात; एकता दौड आणि देशभक्तीपर कार्यक्रम

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय एकता दिन उत्साहात; एकता दौड आणि देशभक्तीपर कार्यक्रम

पिंपरी | १ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत एकता दौड, राष्ट्रीय एकतेची शपथ, व्याख्यान आणि देशभक्तीपर संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून एकता दौड आयोजित करण्यात आली होती. भक्ती-शक्ती चौक, निगडी उड्डाणपूल, काचघर आणि भेळ चौक या मार्गाने दौड काढण्यात आली. त्यानंतर भक्ती-शक्ती चौकात दौडचा समारोप झाला.

एकता दौड सुरू होण्यापूर्वी उपस्थित नागरिकांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत देशभक्तीमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर सर्वांनी राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी योगदान देण्याची शपथ घेतली.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीमुळे देशाची एकता टिकविण्यास मदत झाली असून, त्यांच्या विचारांचा संदेश देशवासीयांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय एकतेच्या शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

या उपक्रमात क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, माजी नगरसदस्य नामदेव डाके, उपायुक्त पंकज पाटील, सहशहर अभियंता बापू गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

सायंकाळी ‘वर्तमान भारतासाठी सरदार पटेल यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर प्रा. महिपतराव ठाकूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानातून सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान, राष्ट्रीय एकतेसाठी त्यांनी केलेले कार्य आणि वर्तमान काळातील त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

त्यानंतर निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘अपरिचित सरदार गाथा’ हा संगीतमय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपायुक्त पंकज पाटील यांच्या अधिपत्याखाली महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या योगदानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रीय एकता, देशभक्ती व सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश होता.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories