परराज्यातून शहरात येणाऱ्या कामगारांना 'वर्क परमिट' सक्तीचे करावे - भाऊसाहेब भोईर

पिंपरी, ता. २६ - पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात परराज्यातून कामासाठी येणाऱ्या नागरिक व कामगारांसाठी नोंदणीकृत ‘वर्क परमिट’ सक्तीचे करावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. याबाबत, भोईर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. 

या निवेदनात म्हटले आहे की, शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रासह नेपाळ, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, पश्चिम बंगाल आदी राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर कामगार व व्यावसायिक स्थायिक होत आहेत. पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भाडेकरुंची नोंदणी करणे बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात १०० टक्के नोंदणी होत नसल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

महापालिका आणि पोलिस प्रशासनाने समन्वय साधून परराज्यातून काम, नोकरी किंवा व्यवसायासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी नाममात्र शुल्कात वर्क परमिट प्रणाली लागू करावी, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. यामुळे, शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची अचूक माहिती उपलब्ध होईल.  अनधिकृत कागदपत्रे काढण्याच्या प्रकार थांबतील. 

गेल्या आठवड्यात सांगवी परिसरात एका घरात बेकायदेशीररीत्या म्यानमारमधील नागरिक राहत असल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर शहर सुरक्षेच्या दृष्टीने कठोर नियमावली तयार करण्याची गरज आहे. ज्या व्यवसायांना परराज्यातील कामगारांची आवश्यकता आहे, त्या व्यावसायिक मालकांनाही संबंधित कामगारांचे वर्क परमिट घेणे बंधनकारक करावे. वर्क परमिटसोबत चारित्र्य पडताळणीची प्रक्रिया राबविल्यास पोलिस प्रशासनाचे काम सुलभ होईल आणि शहरातील नागरिक व कामगारांची अचूक संख्या स्पष्ट होईल. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कडक उपाययोजना करून नियमावली जाहीर करावी, असे भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance