'५२ कोटींच्या' बिलांच्या गैरव्यवहारात अधिकारी, संबंधित नगरसेवक व ठेकेदारांची सखोल चौकशी करावी - सुलभा उबाळे
Apr 11 2026
78
'५२ कोटींच्या' बिलांच्या गैरव्यवहारात अधिकारी, संबंधित नगरसेवक व ठेकेदारांची सखोल चौकशी करावी - सुलभा उबाळे
पिंपरी, ता. ११ - सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकामध्ये काही कामांचा समावेश नसतानाही ७०हून अधिक कामांची बिले एका रात्रीत काढल्याचाप्रकार समोर आला आहे.महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी उपसूचनांच्या आधारे ५२ कोटींहून अधिक रकमेची बिले ठेकेदारांना परस्पर अदा केली आहेत. सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी या उपसूचनांवर सह्या केल्याचे सांगितले जात आहे. पण, वस्तुस्थिती पाहता फक्त भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या सह्या या उपसूचनांवर आहेत. त्यामुळे चौकशी समितीने उपसूचनांवर सह्या करणाऱ्या नगरसेवकांची व बिले दिलेल्या ठेकेदरांची सखोल चौकशी करावी व सत्य नागरीकांसमोर आणावे, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी शुक्रवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत केली.
उबाळे म्हणाल्या, उपसूचनांच्या आधारे बिले देताना या वादग्रस्त उपसूचनांवर सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी सह्या केल्याचे सांगितले जात आहे. परंतु. या उपसूचनांवर शिवसेनेच्या नगरसेवकांच्या सह्या नाहीत. सह्या केवळ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या आहेत. काही नगरसेवकांच्या वॉर्डातील विषय नसताना या उपसूचनांवर सह्या केल्याचे दिसून येते, त्यामुळे या नगरसेवकांनी कोणाच्या दबावामुळे सह्या केल्यात का, त्यावेळी काही आर्थिक गोष्टी घडल्या का, हे स्पष्ट होत नाही. तसेच काही नगरसेवकांच्या बनावट सह्या कोणी केल्या आहेत का, हाही संशय आहे.
त्यामुळे, महापालिकेची सर्वसाधारण सभा व स्थायी समितीला डावलून मान्य करुन घेतलेल्या उपसूचनांचद्वारे ठेकेदारांना बिले देणाऱ्या अधिकाऱ्यांची तसेच सह्या करणारे नगरसवक व ठेकेदारांची विशेष समितीने सखोल चौकशी करावी.