भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन

भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयाचे रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन

रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) मोरवाडी येथे भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.

उद्घाटनानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चव्हाण यांनी संघटनात्मक शिस्त, जनसंपर्क, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ते म्हणाले, भाजपाचे कार्यालय हे केवळ संघटनात्मक कामकाजाचे ठिकाण न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणारे आणि जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करणारे प्रभावी केंद्र ठरावे. पक्षाची खरी ताकद कार्यकर्त्यांच्या समर्पणात आणि जनतेच्या विश्वासात असून, नव्या कार्यालयाच्या माध्यमातून संघटन अधिक सक्षम करत नागरिकांशी असलेली नाळ घट्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले.

पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच नागरिकांना कार्यालयातून योग्य मार्गदर्शन आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सहकार्य मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मोरवाडी येथील भाजपाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, डिजिटल मीडिया कक्ष, पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन, ग्रंथालय आणि विविध विभागांच्या कामकाजासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे विविध मंडल, मोर्चे, आघाड्या आणि प्रकोष्ठ यांच्यातील समन्वय वाढण्यास मदत होणार आहे. तसेच संघटनात्मक बैठका, प्रशिक्षण उपक्रम आणि जनसंपर्क मोहिमांना गती मिळणार आहे.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, यावर भर दिला जाणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, संजय पटणी, वैशाली खाडे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सुजाता पालांडे, दिनेश यादव, सदाशिव खाडे, अनुप मोरे, राजेश पिल्ले, तेजस्विनी दुर्गे, शितल शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories