निगडी | २ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात शेजाऱ्यांच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या एका ३२ वर्षीय रिक्षाचालकावर लोखंडी कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात रिक्षाचालकाच्या डाव्या हाताच्या दोन बोटांना तसेच पायाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास खंडोबामाळ, पाण्याच्या टाकीसमोर, खडीमशीन परिसर, आकुर्डी येथे फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडली.
या प्रकरणी प्रवीण रामचंद्र चोपडे (वय ३२ वर्षे, व्यवसाय रिक्षाचालक, रा. खंडोबामाळ, पाण्याच्या टाकीसमोर, खडीमशीन, आकुर्डी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरासमोर राहणारा शेजारी समाधान अशोक मोरे हा फिर्यादीच्या मामाचा मुलगा राहुल बनसोडे याला हाताने मारहाण करीत होता. त्यावेळी प्रवीण चोपडे हे दोघांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले.
मात्र, भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच, धमकी देत त्यांच्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर आरोपीने घरातील लोखंडी कोयता आणून फिर्यादीवर वार केले. या हल्ल्यात प्रवीण चोपडे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील दोन बोटांना, उजव्या पायाच्या नडगीला आणि डाव्या पायाच्या पाठीमागील मांडीला दुखापत झाली.
याच भांडणादरम्यान फिर्यादीचा मुलगा विराज प्रवीण चोपडे हा तेथे आला असता, त्याच्या डाव्या हाताच्या तळहातालाही दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर प्रवीण चोपडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक १००६/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी समाधान अशोक मोरे याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.