news
clock
बचत गटातील महिलांकडून घरोघरी ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण

बचत गटातील महिलांकडून घरोघरी ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण

बचत गटातील महिलांकडून घरोघरी ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण

लवकरात लवकर कर भरुन सवलतींचा लाभ घ्या, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

पिंपरी, ता. १४ -  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कर संकलन मोहीम सुरु असून, शहरातील मालमत्ताधारकांना महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात येत आहे.

निवासी, बिगर निवासी, औद्योगिक तसेच इतर मालमत्ताधारकांना प्रत्यक्ष भेट देत बचत गटातील महिलांकडून आतापर्यंत ५ लाख ९ हजार ७४७ इतक्या मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने नागरिकांना वेळेत मालमत्ता कर भरून विविध सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असल्याने नागरिकांनी या सुविधेचा त्वरित लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ एप्रिल २०२६ ते १२ मे २०२६ या कालावधीत महिला बचत गटांकडून एकूण ५ लाख ९ हजार ७४७ मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ७ लाख ६६ हजार ३८५ मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी आतापर्यंत १ लाख ५३ हजार ९०२ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. यामधून महापालिकेला १४८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सध्या उन्हाळ्याचे तीव्र तापमान व उष्माघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता घराबाहेर पडण्याचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करावा. ऑनलाइन कर भरणे सुरक्षित, जलद व सुलभ असून घरबसल्या काही मिनिटांत कर भरता येतो. यामुळे रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळता येतो तसेच वेळेची बचत होते. विशेष म्हणजे ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास सवलतींचाही लाभ मिळतो. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून वेळेत मालमत्ता कर भरावा. तसेच, ज्या मालमत्ताधारकांना अद्याप ऑनलाइन अथवा घरपोच स्वरूपात बिल प्राप्त झाले नसेल, त्यांनी संबंधित कर संकलन विभाग कार्यालयाशी संपर्क साधून बिल प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

थकबाकीदारांना बिलासोबत जप्तीपूर्व नोटीस

मालमत्ता कर थकबाकीदारांना वितरित करण्यात येणाऱ्या प्रत्येक बिलासोबत जप्तीपूर्व नोटीसही देण्यात येत आहे. आतापर्यंत २४ हजार ६२६ थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली असून, संबंधितांनी तात्काळ थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरावा 

''पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा महसूलाचा स्रोत आहे. नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरुन महापालिकेला सहकार्य करावे. महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी बिल वाटप केल्यामुळे नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. ऑनलाइन कर भरणाऱ्यांना दिली जाणारी सवलत नागरिकांसाठी लाभदायी असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.''

- रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 दंडात्मक कारवाई टाळावी

''महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरातील सर्व मालमत्ताधारकांपर्यंत महिला बचत गटांच्या माध्यमातून मालमत्ता कर बिल पोहोचविण्याचे काम सुरु आहे. ज्या नागरिकांना अद्याप बिल प्राप्त झाले नाही, त्यांनी विभागीय कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तात्काळ थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा कर भरावा.''

- सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories