खेड तालुक्यात ट्रेलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पिंपरी, ता. २० - खेड तालुक्यात सावरदरी परिसरात बुधवारी (ता. १८) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला असून पती किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत, मनोहर अमृता डोंगरे (वय ३३, रा. खालुंब्रे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १८) रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास सावरदरी गावच्या हद्दीत क्लेवरटेक कंपनीसमोर एचपी चौक ते वासुली फाटा या मार्गावर हा अपघात घडला. फिर्यादी मनोहर डोंगरे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरुन पत्नी रेखा पानबुडे यांच्यासह जात होते.
यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात डोंगरे हे किरकोळ जखमी झाले, तर पाठीमागे बसलेल्या रेखा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी ट्रेलरचालक इसाक बाबू शेख (वय ४३, रा. घाटकोपर, मुंबई) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.