'पीएमपीएमएल'मधील गैरव्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
पिंपरी, ता. २६ - पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपीएमएल) पात्रता नसलेल्या व्यक्तींना नेमणुका, पदोन्नती प्रक्रियेत अनियमितता, विरोध करणाऱ्यांच्या बदल्या, बस जाणीवपूर्वक बंद ठेवण्यासाठी साधनसामग्री न देणे, बैंक गॅरंटीशिवाय करार करणे यासह बस खरेदीत गैरव्यवहार घडले आहेत. या गैरव्यवहारांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.
याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २००७ मध्ये तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांचे स्वतंत्र वाहतूक उपक्रम एकत्र करुन 'पीएमपीएमएल'ची स्थापना कंपनी कायद्याखाली करण्यात आली. या कंपनीत राज्य शासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते.
मात्र, 'पीएमपी'मध्ये पात्रता नसलेल्या व्यक्तींच्या नेमणुका करणे, पदोन्नती प्रक्रियेत अनियमितता, विरोध करणाऱ्यांच्या बदल्या, बस जाणीवपूर्वक बंद ठेवण्यासाठी साधनसामग्री न देणे, बैंक गॅरंटीशिवाय करार करणे असे गंभीर प्रकार घडले. त्यामुळे, कामगारांची बाजू ऐकून घेण्यासाठी कामगार आयुक्तांमार्फत स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत.पैसे देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, एजंटांना तातडीने सेवेतून निलंबित करावे. बस खरेदी आणि बस भाडे करारांचीही सखोल चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे.