पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची हजेरी, राज्यभरात पावसाची शक्यता
पिंपरी, ता. १८ - हवामान विभागाने राज्यभरात पावसाचा अंदाज सांगितला होता. बुधवारी (ता. १८) पिंपरी-चिंचवड परिसरात दुपारी चारच्या सुमारा पावसाची भुरभुर झाली, नंतर पुन्हा ऊन पडले. पुणे शहर परिसरात हलका पाऊस पडला. राज्यभरातही विजा व वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट म्हणजे सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने सांगितले आहे की, बुधवारी (ता. १८) पुणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहून विजांसह पावसाचा अंदाज आहे.
राज्यात मंगळवारी रात्री पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात पावसाने हजेरी लावली.