गोसेवक रामकृष्ण लांडगे यांची महाराष्ट्र शासनाच्या मानद पशुकल्याण अधिकारीपदी निवड
पिंपरी, ता. २ - पिंपरी-चिंचवडमधील गोसेवक रामकृष्ण महादेव लांडगे यांची महाराष्ट्र शासनाच्या मानद पशुकल्याण अधिकारीपदी निवड झाली आहे, शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे. रामकृष्ण लांडगे हे गेली अनेक वर्षे गोसेवा, पशुसंवर्धन आणि पशुकल्याण क्षेत्रात कार्यरत आहेत.
रामकृष्ण लांडगे यांनी निराधार, आजारी जनावरांना आश्रय देणे, त्यांच्यावर उपचार करणे, रस्त्यावर अपघातग्रस्त झालेल्या जनावरांना तातडीने मदत करुन त्यांना उपचारासाठी दाखल करणे आणि त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारणे... असे मोलाचे कार्य केले आहे. पशुकल्याणााठी जनजागृती मोहिमा लांडगे गावोगावी राबवत आहेत. नागरीकांना पशुसंवर्धनाचे महत्त्व व जबाबदारी याबाबत ते सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.
लांडगे यांच्या या अनमोल कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मानद पशुकल्याण अधिकारी या पदावर त्यांची निवड केली आहे. या निवडीमुळे रामकृष्ण लांडगे यांना आता अधिकृतपणे पशुकल्याणाचे कार्य करण्याची संधी मिळणार आहे. पशुकल्याणाच्या कार्यासाठी ते शासन आणि समाज यांच्यात उत्तम समन्वय साधतील, असा विश्वास गोसेवक व नागरीकांनी व्यक्त केला आहे.
या अभिमानास्पद निवडीबद्दल विविध सामाजिक संस्था, गोसेवक, स्थानिक नागरिक तसेच मान्यवरांनी रामकृष्ण लांडगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांनी भविष्यातही याच निष्ठेने पशुकल्याणासाठी कार्य करत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. लांडगे यांची ही निवड केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरत असून त्यांच्या कार्यातून समाजात पशुप्रेम आणि सेवाभाव अधिक दृढ होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
पशुकल्याणाच्या कार्यात स्वतःला झोकून देणार....
''मी अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पशुकल्याणाच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन महाराष्ट्र शासनाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवीन. निराधार, जखमी आणि आजारी जनावरांचे संरक्षण, उपचार आणि पुनर्वसन हेच माझे प्रमुख ध्येय असेल.'' अशी भावना रामकृष्ण लांडगे यांनी व्यक्त केली. गोसेवक