मुस्लीम समाजबांधवांच्या रमजान महिन्याला प्रारंभ, शहरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Feb 19 2026
44
मुस्लीम समाजबांधवांच्या रमजान महिन्याला प्रारंभ, शहरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, ता. १९ - मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला बुधवारी (ता. १८) सुरुवात झाली. त्यानिमित्त हिलाल सिरत कमिटी (चाँद कमिटी) पुणेची बैठक रविवार पेठेतील सिरत कमिटीच्या कार्यालयात झाली. गुरुवारी (ता. १९) पहिला रोजा (उपवास) होणार आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. तसेच रमजाननिमित्त शहरात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.
चाँद कमिटीच्या बैठकीला मौलाना हाफीज ऐहतेशाम, मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन, मौलाना गुलाम अहमद खान, मौलाना जमीरुद्दीन, मौलाना खालीद निजामी, मौलाना ऐजाज, सय्यद अ. माजीद, कारी अब्दुल माजीद, रफीउद्दीन शेख उपस्थित होते.
रमजानचा महिना सहिष्णुता, शांती, संयम, त्याग या मूल्यांची शिकवण देणारा तसेच परस्परांमध्ये आपुलकी, स्नेह वृद्धिंगत करणारा आहे. रमजानच्या महिन्यात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कडकडीत रोजे, पाचवेळा नियमितपणे नमाजपठण केले जाते. रमजानचा पवित्र महिना सुरू होणार असल्याने घरोघरीही तयारी झाली आहे. सामूहिक नमाजपठणही होणार आहे. शहरातील मस्जिदींमध्येही तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारपासून महिनाभर रमजानचे रोजे ठेवले जाणार आहेत. समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.