संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, ८ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान, २४ जुलैला पालखी सोहळा पंढरपुरात पोचणार
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, ८ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान, २४ जुलैला पालखी सोहळा पंढरपुरात पोचणार
पिंपरी, ता. १४ - मे महिना संपत आला की सबंध महाराष्ट्राला ओढ लागते पंढरपूर आषाढी वारीची आणि आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माऊलींचा पालखी सोहळा ८ जुलै रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. नऊ आणि दहा जुलै रोजी पालखीचा मुक्काम पुण्यात भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात असणार आहे. ११ आणि १२ जुलै रोजी पालखीचा मुक्काम सासवडमध्ये असेल. २४ जुलैला पालखी सोहळा पंढरपुरात दाखल होईल.
आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची बुधवारी (ता. १३) सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.या बैठकीला सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, अॅड. रोहिणी पवार, आमदार हेमंत रासने, भाऊसाहेब गोसावी महाराज आणि दिंडीकरी, फडकरी उपस्थित होते. डॉ. देखणे आणि अॅड. उमाप यांनी सोहळ्याची सविस्तर माहिती दिली.
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आठ जुलैला रोजी देऊळवाड्यातून प्रस्थान ठेवणार आहे. त्या दिवशीचा मुक्काम आळंदीत नवीन दर्शन मंडपात होईल. नऊ आणि दहा जुलै रोजी पालखीचा मुक्काम पुण्यात भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात असणार आहे. सासवडमध्ये ११ आणि १२ जुलै रोजी मुक्कामी राहील. जेजुरी (ता. १३ जुलै), वाल्हे (ता. १४) मुक्कामी राहील. १५ जुलै रोजी पालखी लोणंद येथे असेल. तिथे माउलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येईल. १६ जुलै रोजी पालखी सातारा जिल्ह्यातील फलटण-लोणंद मार्गाजवळ चांदोबाचा लिंब येथे पोचेल, तेथे सोहळ्यातील पहिला उभे रिंगण सोहळा होईल व पालखी तरडगाव येथे मुक्कामसाठी जाईल. पालखी सोहळा १७ जुलैला फलटण येथे, १८ जुलैला बरड येथे, १९ जुलैला नातेपुते येथे मुक्कामी असणार आहे.
दिनांक २० जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होईल आणि पालखी पुढे माळशिरस येथे मुक्कामाठी असेल. दिनांक २१ जुलै रोजी खुडूस फाटा येथे सकाळी दुसरे गोल रिंगण होणार आहे व सायंकाळी धावाबावी माउंट येथे मानाचे भारुड पार पडले. नंतर सोहळा वेळापूर मुक्कामी जाईल. २२ जुलै रोजी ठाकूरबुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण आणि दसूरफाटा येथे संत सोपानदेव-माउलींच्या बंधू भेटीनंतर पालखी सोहळा भंडीशेगाव मुक्कामासाठी जाईल. २३ जुलै रोजी दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण झाल्यानंतर सोहळ्याचा मुक्काम वाखरी येथे असेल. २४ जुलै रोजी तिसरे उभे रिंगण पंढरपूरजवळील इसबावी येथे होईल आणि माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करेल.
रिंगण सोहळ्याचा तपशील.....
- पहिले उभे रिंगण - चांदोबाचा लिंब (ता. १६ जुलै)
- पहिले गोल रिंगण - पुरंदवडे (ता. २० जुलै)
- दुसरे गोल रिंगण - खुडूस फाटा (ता. २१ जुलै)
- तिसरे गोल रिंगण - ठाकुरबुवाची समाधी (ता. २२ जुलै)
- दुसरे उभे रिंगण - बाजीरावची विहीर वाखरी (ता. २३ जुलै)
- चौथे गोल रिंगण - बाजीरावची विहीर वाखरी (ता. २३ जुलै)
- तिसरे उभे रिंगण - इसबावी, पंढरपूरजवळ (ता. २४ जुलै)