पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सेवा संकल्प’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सेवा संकल्प’

पिंपरी | 17 सप्टेंबर 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी बंधू-भगिनींसमवेत ‘संकल्पाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करत शहरात ‘सेवा संकल्प अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

या उपक्रमात शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि नागरिककेंद्री बनविण्यासाठी प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले. स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक सहभागाशी संबंधित उपक्रमांना पुढे व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शिक्षण समिती सभापती रविना अंघोळकर, महिला व बालकल्याण सभापती राणी पठारे, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मधुकर बच्चे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवाभाव आणि विकासाभिमुख भूमिकेतून प्रेरणा घेऊन शहरासाठी सकारात्मक संकल्प करण्याची भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘सेवा संकल्प अभियान’ केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता प्रशासन, लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागातून शहराच्या विविध भागांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबत नागरिकांमध्ये शहराप्रती कर्तव्य आणि सामाजिक सहभागाची भावना वाढविण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. महापौरांनी ‘सेवेचा एक दिवा… शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सामूहिक संकल्प’ असा संदेश दिला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories