स्वच्छता क्षमता बांधणी कार्यशाळेत स्वच्छ शहरासाठी सफाई सेवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण
स्वच्छता क्षमता बांधणी कार्यशाळेत स्वच्छ शहरासाठी सफाई सेवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण
पिंपरी, ता. ९ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सफाई सेवकांसाठी स्वच्छता विषयक क्षमता वृद्धी कार्यशाळांचे आयोजन शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नुकतेच करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६च्या पार्श्वभूमीवर आठही क्षेत्रीय कार्यालयांतील सफाई सेवकांना आरोग्य व सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमांतर्गत एकूण ३ हजार ५०० सफाई सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहा. आयुक्त किरणकुमार मोरे यांनी शहर स्वच्छ व सुंदर राखण्यात सफाई सेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. स्वच्छता करताना योग्य साधने आणि सुरक्षा उपकरणांचा वापर करणे आवश्यक असून, दिलेल्या प्रशिक्षणाचा दैनंदिन कामकाजात प्रभावीपणे उपयोग करावा, असे त्यांनी नमूद केले. तसेच, सफाई सेवकांनी चांगल्या आरोग्य सवयी अंगीकारून नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले
या कार्यशाळेत क्षमता वृद्धी, कौशल्य विकास आणि ज्ञान व्यवस्थापन या बाबींवर विशेष भर देण्यात आला. सर्व सफाई सेवकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (PPE किट) योग्य पद्धतीने वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन नियम - २०२६ याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कचरा संकलन आणि व्यवस्थापन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत घरगुती कचरा गोळा करणाऱ्या वाहनांवरील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमास सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयांतील सफाई सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- PPE किट, personal protective equipment, घनकचरा व्यवस्थापन, solid waste management, कचरा संकलन, waste collection, प्रशिक्षण कार्यक्रम, training program,
- स्वच्छ शहर, clean city, आरोग्य व सुरक्षितता, health & safety,
- स्वच्छ भारत अभियान, Swachh Bharat Mission,
- सफाई सेवक, cleaning staff,
- स्वच्छता क्षमता, sanitation training,