वाकड पोलिसांकडून घड्याळ चोरीचा छडा; दोन आरोपी अटकेत, ९.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाकड पोलिसांकडून घड्याळ चोरीचा छडा; दोन आरोपी अटकेत, ९.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाकड | १२ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात घड्याळाचे दुकान फोडून महागडी घड्याळे चोरणाऱ्या दोन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. चोरी केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला होता. मात्र, पोलिसांनी तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख ८४ हजार ७०० रुपये किमतीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान थेरगावमधील डांगे चौकाजवळील लाले चष्मेवाले अँड वॉचेस या दुकानात चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून, पीओपी फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील विविध कंपन्यांची महागडी घड्याळे आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेतील कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) आणि ३(५) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.

चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेल्यामुळे सुरुवातीला तपासात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सुमारे १५० ते २०० सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली.

तपासादरम्यान एक आरोपी चोरीची घड्याळे विक्री करण्यासाठी काळाखडक, वाकड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अमीर शब्बीर शेख (वय २८ वर्षे) याला १० नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्याचा साथीदार इरफान हमीद मुलाणी (वय २१ वर्षे, राहणार उर्से, तालुका मावळ) यालाही १० नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी अटक केली.

अटक आरोपींकडून पोलिसांनी टायटन, टायमेक्स, रागा, फास्टट्रॅक यांसारख्या विविध कंपन्यांची १०८ महागडी घड्याळे, चोरी केलेला सीसीटीव्ही डीव्हीआर आणि मोबाईल फोन हस्तगत केला.

जप्त मुद्देमालामध्ये ९ लाख ४ हजार ७०० रुपयांची घड्याळे, ५० हजार रुपयांची ॲक्टिव्हा दुचाकी आणि ३० हजार रुपयांचा मोबाईल फोन असा एकूण ९ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि वसंतराव तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे, पोलीस अंमलदार सपोनि़ दळे, तंदू गिरे, विजय घाडगे, विजय भुसारे, मोहम्मद नदीफ, सचिन गायकवाड, विजय मोरे, कौतेय खराडे, ज्ञानदेव झोडे, काश्मारी पालवे, विक्रम भगत, समाधान काळुंखे, प्रमोद गायकवाड, अभिषेक नांडे आणि मंगेश लोखंडे यांनी सहभाग घेतला.

चोरीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात वाकड पोलिसांना यश आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories