सायकलच्या धक्क्यावरून तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा

सायकलच्या धक्क्यावरून तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा

निगडी | ११ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील दळवीनगर परिसरात सायकलच्या हँडलचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचा राग मनात धरून एका २३ वर्षीय तरुणाला तिघांनी संगनमताने लाथाबुक्क्या आणि लाकडी बांबूने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला आणि दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. ही घटना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता दळवीनगर परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम अनिल जाधव (वय २३ वर्षे, दत्तवाडी, आकुर्डी, पुणे; मूळ गाव आर्वी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात किरण (पूर्ण नाव माहीत नाही, वय अंदाजे २३ वर्षे), गणेश (पूर्ण नाव माहीत नाही, वय अंदाजे २३ वर्षे) आणि एका अनोळखी तरुणाविरोधात (वय अंदाजे २२ वर्षे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी दळवीनगर, चिंचवड परिसरातील रहिवासी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी ओम जाधव यांच्या नातेवाइकाचा मुलगा साई पवार याच्या सायकलच्या हँडलचा धक्का शेजारी राहणाऱ्या शिवा आणि इलेश यादव यांना लागला होता. या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्याच वादाचा राग मनात धरून आरोपी क्रमांक एकाने फिर्यादी ओम जाधव यांच्याशी वाद घातला.

त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादी ओम जाधव हे श्रेयस उतेकर यांच्यासोबत वाल्मीकी मंदिराजवळील दळवीनगर, पांढरकर चाळ झोपडपट्टी परिसरात गेले होते.

त्यावेळी आरोपी किरण, गणेश आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी तरुणाने संगनमताने फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्या आणि लाकडी बांबूने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला आणि दोन्ही हातांना दुखापत झाली.

मारहाण सुरू असताना फिर्यादीला सोडवण्यासाठी श्रेयस उतेकर आणि आजूबाजूचे नागरिक पुढे आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही धमकावून परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१)(३) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यातील कलम ३ व ७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories